पाच प्रवाशांची सुखरूप सुटका
अलिबाग ः प्रतिनिधी
मुरूडजवळ समुद्रात गुजरातमधील बोट भरकटल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. 12) रोजी फिलिपाईन्स देशातून आलेली बोट अलिबागजवळ नवगाव येथील समुद्रातील खडकात अडकली. यातील पाच प्रवाशांना तटरक्षक दल, जिल्हा पोलीस, नौदल, अग्निशमन दल, सीआयएसएफ पथकाच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. एक भारतीय आणि चार परदेशी नागरिक असलेली फिलिपाईन्सची बोट दुबई येथून कोचीन, मालदिवमार्गे मुंबईत आली होती. या बोटीत करुणा निधन पांडे (भारतीय), बाथी सार (सेनेगल), कारमेन क्लारे लातुंबो सल्वनी, जयरालड फजनोय नाला आणि मार्कोनी फाब्रो फर्नाडीस (फिलिपाईन्स) असे प्रवासी होते. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही बोट रेवस बंदरात उभी होती. गुरुवारी (दि. 11) मध्यरात्रीच्या सुमारास बोटीत तांत्रिक बिघाड दुरूस्त करून पुन्हा सर्व जण पुढील प्रवासाला निघाले, मात्र सोसाट्याचा वारा व समुद्रही खवळलेला असल्याने बोट भरकटली. पुढील धोका लक्षात घेत कप्तानने बंदराजवळ बोट नांगरून ठेवली, पण ही बोट सरकत नवगावजवळ आली. या वेळी बोट खडकावर आपटल्यामुळे तिला छिद्र पडले. त्यामुळे बोटीत पाणी शिरले. परिणामी बोटीच्या सोलर पॅनलच्या बॅटरींना अचानक आग लागली. त्यावेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. प्रसंगावधान राखून बोटीतील प्रवाशांनी संबधित अधिकारी यांना मदतीसाठी संपर्क केला. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने बोटीत पाचही जणांना शुक्रवारी ( दि. 12) सकाळी सुखरूप बाहेर काढले.