Breaking News

जांभा दगडाने माथेरानचे रस्ते झाले मजबूत

सह्याद्री पर्वतराजीमध्ये समुद्र सपाटीपासून 803 मीटर उंचीवर गर्द हिरव्यागार वनराईची वृक्षसंपदा असलेले डोंगर माथ्यावर वसलेले, वाहनमुक्त, प्रदुषणमुक्त, थंड हवेचे ठिकाण म्हणजेच माथेरान! माथेरानचा शोध सन 1850मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर हुयूज पॉइंट्ज मॅलेट यांनी लावला. त्या वेळी ते चौक गावातून वन ट्री हिल पॉईंटच्या नाळीतून पायी डोंगर चढत माथेरानला येत आणि परत मुंबईला जाण्यासाठी रामबाग पॉईंटहून खाली उतरत असत. सन 1851-52मध्ये मुंबई प्रांताकडून माथेरानला येण्यासाठी चौक ते रामबाग रस्ता बांधला आणि हा रस्ता आजही माथेरानचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे सन 1856-57 तद्नंतर मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी माथेरानला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आणि प्रेक्षणीय स्थळे यांचा विकास करण्यासाठी मुबलक निधी दिला होता. त्याचवेळी अनेक दानशूर व्यक्तींनी ही स्व:खर्चाने काही पॉईंट्स विकसित केले होते. माथेरान या प्रेक्षणीय स्थळांवर जाऊन आणि तेथून निसर्गाच्या अदभुत छटा आणि थंड व आल्हादायक वातावरण अनुभवायला अनेक पर्यटक येऊ लागले आणि माथेरानच्या  नावलौकिकात दिवसेंदिवस भर पडू लागली. स्वातंत्र्योत्तर काळात तसेच सन 2003च्या पर्यावरण खात्याच्या कडक निर्बंधाने प्रेक्षणीय स्थळांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. खरे पाहता माथेरानला सध्या असलेली 38 प्रेक्षणीय स्थळे हीच माथेरानची खरीखुरी वैशिष्ट्ये, पण या पर्यटन स्थळांचा र्‍हास हा दरवर्षी माथेरानला होत असलेल्या अतिप्रचंड पर्जन्यवृष्टीने होत असतो. त्यामुळे सर्व प्रेक्षणीय स्थळांकडे  जाणार्‍या तीव्र उताराच्या रस्त्यामुळे दरवर्षी मातीची धूप होऊन गटारे, मोर्‍या आणि रस्ते अनेक ठिकाणी वाहुन जात पॉईंटस नामशेष होण्याच्या मार्गावर होते. त्यासाठी माथेरान नगर परिषदेने ही बाब ध्यानात घेऊन माथेरानला गटारे, मोर्‍या, रस्ते, प्रेक्षणीय स्थळे वाचविण्यासाठी, पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी आणि पर्यावरण वाचविण्यासाठी कार्य हाती घेतले. सन 2005मध्ये झालेल्या अतिप्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे अनेक महत्वाचे पॉईंट्स आणि तेथील अनेक रस्ते खचून नामशेष झाले होते. यातील माथेरानमधील पॉईंट्सचा राजा म्हणून ज्याची ओळख होती, तो पॉइंट म्हणजे पॅनोरमा हा पुर्णपणे नामशेष होत चाललेला. या पॉइंटचे नुतनीकरण हे पर्यावरणदृष्ट्या करण्यात आले आहे. माथेरानच्या प्रवासात सुरुवातीला असलेले मायरा पॉइंट आणि हार्ट पॉइंट हेसुद्धा नामशेष झाले होते. हे पॉईंट पुन्हा एकदा नव्या दिमाखात उभे राहिले आहेत. त्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. माथेरानला एकुण बदलाच्या वाटचालीत एमएमआरडीएने नगर परिषदेला मोठा निधी दिला आहे आणि त्याच माध्यमातून एकूण 15 प्रेक्षणीय स्थळांची रूप बदलते आहे तसेच आगामी काळात ही बाकी राहिलेले पॉईंट्स टप्याटप्याने विकसित करण्यात येणार आहेत, परंतु कोकणात आढळणार्‍या जांभा दगडाने हे सर्व पॉईंट नवीन रुल धारण करून पर्यटकांच्या दिमतीला हजर झाले आहेत.  वेळोवेळी पाठपुरावा करुन शासनाकडून आलेल्या भरीव निधीचा उत्तम प्रकारे सदुपयोग करुन घेतला.प्रेक्षणीय स्थळांचा, पर्यावरणचा र्‍हास थांबविण्यासाठी तेथे पर्यटकांना सुखसोयी मिळण्यासाठी  व पर्यटन वाढीसाठी एकूण 15 पॉईंट्स सुशोभित करण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येक विभागातले  नामशेष होऊ पाहणारे आणि मुख्य पॉईंट्स पुनरुज्जीवित करण्यात येत आहेत. हे पॉईंट्स अजुनही प्रेक्षणीय करण्यात येत आहेत. माथेरान येणारे पर्यटक यांच्यासाठी सात पॉइंट सर्कल पर्यटकांच्या पर्यटनाचे दृष्टीने महत्वाचे आहे.त्यातील चार पॉईंट्स विकसित होत असून यात रामबाग पॉइंट, बिग चौक पॉइंट, बेल्वेडियर पॉइंट आणि वन ट्री हिल या पॉइंटचा समावेश आहे. वन ट्री हिल सोडून बाकी तीन पॉइंटचे काम अंतिम टप्प्यात आहे.त्याचवेळी लॉर्डस पॉइंट, एक्को पॉइंट, हनिमून पॉइंट, मलंग पॉइंट, कोरोनेशन पॉइंट, मालडुंगा पॉइंट, मंकी पॉइंट, खंडाळा पॉइंट आदी प्रेक्षणीय स्थळांचा दरवर्षी होणारा र्‍हास आता होणार नाही असे दिसून येत आहे. त्यात या प्रेक्षणीय स्थळांना शिवसेनेच्या कार्यकाळात  जणु काही नव्यानेच जन्म मिळाला आहे,त्यात ते नयनरम्य आणि प्रेक्षणीय होत आहेत.यात प्रामुख्याने मुख्य रस्त्याहून पॉईंटला जाणार्‍या रस्त्याच्या बाहेर प्रत्येक पॉइंटवर आकर्षक घोडा स्टॅण्ड हे पर्यटकांना घोड्यावरुन व्यवस्थित उतरायला व घोड्यावर बसायला बांधलेले आहेत. त्यामुळे अगदी सहजपणे आबालवृद्ध सुध्दा घोड्यावर स्वार होऊन इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा, घनदाट जंगलातील रस्त्यावरून घोड्यावर स्वार होऊन रपेट मारण्याचा आनंद घेत आहेत. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये  जाण्यासाठी काही ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉकचे तर काही ठिकाणी जांभा दगडाचे खड्डेविरहित तसेच धुळविरहित सुबक रस्ते बनविण्यात आले आहेत.पॉईंटला जाताना पाण्याच्या योग्य निचरा होण्यासाठी बाजूला गटारे, मोर्‍या, रेलींग बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे माथेरानला होणार्‍या जोरदार पर्जन्यवृष्टीचे पाणी व्यवस्थितपणे या गटारांतून व मोर्‍यांतुन वाहुन जाईल,त्यावेळी रस्ते हे मातीधुप आणि वृक्षांची मुळांपासून पडझड देखील थांबणार आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षांना आधार, वृक्ष जतन व वृक्षसंवर्धन म्हणून दगडी पार तसेच दरड कोसळू नये व मृदा संधारण होण्यासाठी गॅबियन वॉल बांधुन वृक्षांच्या मुळांना भक्कम आधार देण्यात आला आहे.त्याचवेळी पर्यटकांसाठी पॉईंट्सला जाणार्‍या रस्त्यांवर पर्यटकांना काळोखात प्रवास करताना प्रकाश दिसावा यासाठी पथदीवे आणि सोलर दिवे लावण्यात आले आहेत. तर धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या जिवन सुरक्षिततेसाठी पॉईंट्सला संरक्षक रेलींग (कठडे)  लावले आहेत. त्याचवेळी पॉईंट्सला नयनरम्य देखावे पाहण्यासाठी व चालून थोडासा क्षीण वाटत असेल तर पर्यटकांना बसण्यासाठी सुबक बाकडे बसविण्यात आले आहेत.तर माथेरान मधील सर्व प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी महत्वाची गरज असलेले सुलभ शौचालय ही त्या त्या मुख्य पॉईंट्सच्या बाहेर जवळपास बांधण्यात आले आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये महत्वाचा सहा महिन्यांचा कालखंड वाया गेला, आणि आता ही 2021 मध्ये ही  पर्यटन जवळपास दोन महिने पुर्णपणे ठप्प आहे. माथेरानकरांचे पुर्ण जिवनमान हे पर्यटन व त्यावर आधारित व्यवसाय यावर अवलंबून आहे. माथेरानचे जवळपास 50 टक्के पॉईंट्स सुशोभित होत आहेत आणि प्रेक्षणीय होत आहेत. त्यामूळे माथेरानला राहुन ही माथेरानचे पॉईंट्स न पाहणारी खुद्द स्थनिक जनता सुद्धा खुश आहे.माथेरानची अनेक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी आपल्या कुटुंबासहित निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी येत आहेत. माथेरानमधील स्थानिक आणि पर्यटकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

-संतोष पेरणे

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply