लंडन ः वृत्तसंस्था
न्यूझीलडंने माघार घेतल्यानंतर इंग्लंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव आगामी पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये मर्यादित षटकांचे सामने खेळणार होते. ‘इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संघांच्या पाकिस्तानात होणार्या अतिरिक्त सामन्यांविषयी चर्चा करण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची (ईसीबी) बैठक झाली. यामध्ये झालेल्या चर्चेनुसार ऑक्टोबरला होणार्या या दौर्यातून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे ईसीबीने म्हटले. इंग्लंडचा संघ 2005नंतर प्रथमच पाकिस्तानचा दौरा करणार होता. 13, 14 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध त्यांचे दोन ट्वेन्टी-20 सामने होणार होते. दौरा रद्द करण्याच्या या निर्णयाबद्दल ईसीबीने पाकिस्तान क्रिकेट मंडळाची माफीही मागितली आहे.
न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा पुढील वर्षी?
न्यूझीलंड संघाने मागील शुक्रवारी पाकिस्तान दौर्यातून अचानक माघार घेतली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी काही तास आधी न्यूझीलंडने सामन्यात खेळण्यास नकार दिला, परंतु न्यूझीलंडचा संघ तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-20 सामन्यांसाठी पुढील वर्षी पाकिस्तान दौरा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी दिली.