Monday , January 30 2023
Breaking News

बीसीसीआयकडून खेळाडूंना मानधनवाढ; गत स्थानिक हंगामासाठीही मिळणार नुकसानभरपाई

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

यंदाच्या देशांतर्गत स्थानिक क्रिकेट हंगामासाठी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच गतवर्षी रणजी करंडक रद्द करण्यात आल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जाणार्‍या क्रिकेटपटूंना 50 टक्के भरपाई देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. बीसीसीआयच्या कार्यकारी परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. गतवर्षी मार्च महिन्यापासून देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली. कोरोनाच्या सावटादरम्यानही सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आली, मात्र प्रतिष्ठित रणजी स्पर्धा प्रथमच रद्द करावी लागली. खेळाडूंनी यासंबंधी नुकसानभरपाई मिळावी म्हणून बीसीसीआयकडे मागणी केली होती. बीसीसीआयने त्यांच्या मानधनातही वाढ करून खेळाडूंना सुखद धक्का दिला. गतवर्षी विजय हजारे आणि मुश्ताक अली स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंना प्रत्येकी 70 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. एका रणजी सामन्यासाठी खेळाडूला प्रत्येकी 1.40 लाख रुपये मिळतात. 40 रणजी सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूंच्या मानधनात एक लाख रुपयांची वाढ करून त्यांना 2.40 लाख रुपये देण्यात येतील. खेळाडूंच्या सामन्यानुसार त्यांना पगारवाढ करून देण्यात आली आहे. महिला खेळाडूंनासुद्धा गेल्या हंगामातील 12,500 रुपयांच्या तुलनेत प्रत्येक सामन्यासाठी 20 हजार इतके मानधन देण्यात येणार आहे. 2019-20च्या स्थानिक हंगामात खेळलेल्या सर्व खेळाडूंना गतवर्षीचा हंगाम रद्द झाल्यामुळे 50 टक्के नुकसानभरपाई देण्यात येईल. याशिवाय आगामी स्थानिक हंगामासाठी मानधनात वर्गीकरणांच्या आधारे वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टीम इंडियाचा कार्यक्रम जाहीर

भारतीय क्रिकेट संघाच्या नोव्हेंबर 2021 ते जून 2022मधील आंतरराष्ट्रीय मालिकांचा कार्यक्रमही सोमवारी जाहीर करण्यात आला. या घरगुती हंगामातील दोन सामने महाराष्ट्रात होतील. यामध्ये 3 डिसेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी मुंबईत, तर 14 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी ट्वेन्टी-20 लढत नागपूर येथे खेळवण्यात येणार आहे. या कार्यकाळात घरच्या मैदानावर भारत तब्बल 14 ट्वेन्टी-20, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. ट्वेन्टी-20 विश्वचषकानंतरच्या या आठ महिन्यांच्या कालावधीत न्यूझीलंड (नोव्हेंबर-डिसेंबर), वेस्ट इंडिज (फेब्रुवारी), श्रीलंका (फेब्रुवारी-मार्च) आणि दक्षिण आफ्रिका (जून) हे संघ भारत दौर्‍यावर येणार आहेत, तर डिसेंबरमध्ये भारत हा आफ्रिकेच्या दौर्‍यावर जाणार असून एप्रिल-मे महिन्याचा कालावधी आयपीएलसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply