Breaking News

नवघर-मानकिवली रस्ता गेला खड्ड्यात

ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यामधील माणकिवली गावातील रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, पावसामुळे रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

माणकिवली ते नवघर, चिंचवली रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला गेला आहे. या रस्त्याची खडी सर्वत्र पसरून मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर चिखल झाल्याने अनेक वाहने घसरुन अपघात होत आहेत. पादचार्‍यांनासुद्धा जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यातून वाहन गेल्याने पादचार्‍यांच्या अंगावर चिखलयुक्त पाणी उडत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नवघर-मानकिवली हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, आम्हालाही या रस्त्यावरून प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे, असे माणकिवली ग्रामपंचायतचे ग्रामसेवकांनी सांगितले.

पंतप्रधान ग्रामीण सडक योजना अंतर्गत काही वर्षापुर्वी नवघर-मानकिवली रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेकडे असणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा रस्ता अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झालेला नसून, तो जिल्हा परिषदेकडेच आहे. जिल्हा परिषदेचे अभियंता नागावकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, या रस्त्या संदर्भात मी पूर्ण माहिती घेऊन आपल्याला माहिती देतो, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून दरवर्षी नुसार यावर्षीही गणेशोत्सव खड्ड्यातूनच प्रवास करून साजरा करायचे का? कोणत्याच अधिकार्‍यांना या रस्त्यावर पडलेले खड्डे दिसून येत नाहीत का? या रस्त्यावरून अवजड वाहने चालत असल्याने रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. त्याकडे वाहतूक पोलीस खात्याचेही दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची बिकट अवस्था लोकप्रतिनिधींना दिसत नाही का? असे संतापजनक सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply