माणगाव : प्रतिनिधी
कोमसापच्या माणगाव शाखेच्या अध्यक्षा सायराबानू वजीर चौगुले यांच्या ‘चांदणं शब्दांचं‘ या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकताच प्रसिद्ध कवयित्री फरजाना इकबाल यांच्या हस्ते करण्यात आले. मनातला संवेदनशीलतेचा झरा कायम जिवंत ठेवला तरच आपण सतत लिहू शकतो, असे प्रतिपादन फरजाना इकबाल यांनी या वेळी केले.
कोमसाप माणगाव शाखेच्या उपाध्यक्ष श्रद्धा भिडे यांनी प्रास्ताविकात शाखेच्या वाटचालीचा आढावा घेतला. राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य एल. बी. पाटील, अ. वि. जंगम यांनी मनोगत व्यक्त केले. माणगाव शाखेतील सदस्यांनी चांदणं शब्दांच या काव्यसंग्रहातील पाच कवितांचे वाचन केले. या वेळी नीता सखाराम करकरे (नूतन माध्यमिक विद्यालय, खरवली) आणि दिगंबर अडीत (प्राथमिक शाळा, विळे धनगरवाडा) यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कवी अजित शेडगे व कवयित्री अपूर्वा जंगम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कोमसापचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, सुधीर शेठ, सुरेखा दांडेकर, ज्योती बुटाला, नृत्यशिक्षिका विद्या कदम, हेमंत बारटक्के, संध्या दिवकर, सदानंद ठाकूर, सीमा रिसबुड, शीतल मालुसरे आदी या वेळी उपस्थित होते. कवी रामजी कदम यांनी आभार मानले.