खोपोलीत विजयादशमी उत्सव साजरा
खोपोली : प्रतिनिधी
प्रत्येक भारतीयाच्या मनात शाखेच्या माध्यमातून देशभक्ती रुजविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. शतक किंवा शतकोत्तर सोहळे साजरे करण्यात संघाला स्वारस्य नाही, तर हा देश लवकरात लवकर परम वैभवाला नेऊन समाज व संघ कसा एकरूप होईल हे संघाचे उद्दिष्ट स्वयंसेवकाला पहावयास आवडेल, असे प्रतिपादन संघाचे जिल्हा कार्यवाह सुजित टिळक यांनी शुक्रवारी (दि. 15) खोपोली येथे केले.
रा. स्व. संघाचा स्थापनादिन व विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी खोपोलीतील ब्राह्मण सभा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुजित टिळक प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. संघाचे काम सर्व क्षेत्रात असल्यामुळे संघ व समाज हे वेगवेगळे नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
आचार, विचार, व्यवहार व विस्तार या चारसूत्रीवर आधारित संघाचे कार्य चालते असे सांगून टिळक यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत विस्तृत माहिती दिली. संघाचे खालापूर तालुका कार्यवाह अविनाश मोरे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी ध्वजारोहण झाल्यानंतर, वैयक्तिक पद्य अमृतवचन स्वयंसेवकांनी सादर केले. त्यानंतर स्वयंसेवकांनी देशभक्तीवर गीते सादर करीत शहराच्या विविध भागातून पथसंचलन केले. अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले. पथसंचलन सुरू असताना ज्येष्ठ स्वयंसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.