ठाण्यातील 11 सदनिका जप्त
ठाणे : प्रतिनिधी
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी (दि. 22) मोठी कारवाई करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. यामध्ये ठाण्याच्या वर्तक नगर भागातील निलांबरी अपार्टमेंटमधील 11 सदनिकांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे सहा कोटी 45 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीकडून पुष्पक ग्रुपची एक कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिडेटने खरेदी केलेल्या 11 सदनिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत. साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा एक एंट्री ऑपरेटर असून त्याच्या माध्यमातून 30 कोटींचे कर्ज साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड यांना शेल कंपन्यांच्या माध्यमातून ट्रान्सफर केले गेले. त्याच पैशातून या 11 सदनिकांची खरेदी केली गेली असे सांगितले जात आहे तसेच भविष्यात श्रीधर पाटणकर यांचीदेखील ईडीच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता येत आहे.
याआधी ईडीने पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनीविरोधात 6 मार्च 2017 रोजी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता तसेच याआधीच ग्रुपच्या मालकीची 21 कोटी 46 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे.