Breaking News

मावळची जनता इतिहास घडविणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; विरोधकांवर हल्लाबोल

(पान 1 वरून) ज्याप्रकारे तिसर्‍या टप्प्यात मतदान झाले ते बघता बारामती, माढा हलले आहे. आता नंबर मावळचा आहे. मावळची जनता इतिहास घडविणार असून, मागच्या वेळापेक्षाही जास्त मतांनी खासदार श्रीरंग बारणे निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणात त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर तसेच पनवेल महापालिका चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचे प्रशस्तिपत्रही दिले.

आपल्या आक्रमक भाषणात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला. विरोधी पक्षाकडून शरद पवार ग्लोव्हज, पॅड, हेल्मेट घालून माढाच्या मैदानात ओपनिंगला उतरले. सेंच्युरी करणार म्हणून ते पीचवर आले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगली टाकल्यावर मी खेळणार नाही, म्हणत पवार आल्या पावली पॅव्हेलियनमध्ये परतले. अचानक मैदान सोडून त्यांनी यू-टर्न घेत मी आता बारावा गडी म्हणून घोषणा केली. आता अशी अवस्था झालेल्या पक्षाचा कॅप्टनच खेळत नाही म्हटल्यावर त्यांची चिल्ली-पिल्ली काय खेळणार, असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ही निवडणूक श्रीरंग बारणे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सामान्य माणसाच्या जीवनाची व देशाच्या विकासाची आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाने देशात अनेक जनहिताच्या योजना राबविल्या. या योजनांमुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात विकासाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन झाले. मोदी सरकारने नुसता विकासच केला नाही; तर भ्रष्टाचाराला आणि भ्रष्टाचार करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळे शेवटच्या माणसाचा विकास होत आहे. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देश विकासात बदलला. आता नुसता बदल नाही; तर जगामध्ये आपल्या देशाची मान सन्मानाने उंचावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मोदी सरकारने विकासाच्या अनेक योजना विविध घटकांसाठी राबविल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणी, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजना, सिडकोच्या माध्यमातून दोन लाख घरे, उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर वाटप, आयुष्यमान योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्यसेवा, छोटे उद्योजक-दुकानदारांना तीन हजार रुपये पेन्शन, शेतकर्‍यांना मदत अशा प्रकारे प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोदी सरकारने केला आहे.

पूर्वीच्या आणि आताच्या भारताची तुलना करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, काँग्रेस आघाडीच्या काळात कुणीही येऊन आपल्याला टपली मारून जायचा. आपल्या सैनिकांमध्ये धमक होती, पण काँग्रेस सरकारमध्ये दम नव्हता. म्हणून देशात बॉम्बस्फोट, गोळीबार होत असत. 2008मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा काँग्रेसने निषेधाचे नारे देऊन युनोमध्ये आर्जव करण्यात धन्यता मानली. 2014 साली देशात परिवर्तन झाले. नवीन सरकार सत्तेवर आले. त्यानंतर 2016मध्ये उरीत दहशतवादी हल्ला होऊन आपले जवान शहीद झाले. त्यावेळी जनता म्हणाली की मोदीजी, सैन्याला आदेश द्या. पंतप्रधान मोदींनी सैन्याला कारवाई करण्याची मुभा दिली आणि आपल्या शूर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला. त्या दिवशी जगाला भारताची ताकद कळली. काँग्रेस सरकारमध्ये कुवत नव्हती. सैन्य म्हणायचे आदेश द्या, तर हे म्हणायचे चर्चा करतोय. पंतप्रधान मोदींनी चर्चा न करता तुम्ही एक मारला, तर मी चार मारेन, असे ठणकावून सांगत ते कृतीतही आणले. कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे पाकिस्तानही वाकडेच आहे. पुन्हा पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. जनतेच्या भावना तीव्र झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी सैन्याला सांगितले की, तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या पद्धतीने बदला घ्या. त्यानुसार सैन्याने थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. याउपर पाकिस्तानसोबत विरोधक सुरात सूर मिसळून पुरावे मागतात. यांच्या जाहीरनाम्यातही युद्ध नको, चर्चा करा, अशी भाषा आहे, मात्र हा ऐकणारा नाही तर ठोकणारा नवभारत आहे.

सभेस व्यासपीठावर भाजप राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगर संघटक प्रथमेश सोमण, भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, प्रल्हाद केणी, आरपीआयचे मंगेश धिवार आदी उपस्थित होते. आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्तेही हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

  • ना. रामदास आठवलेंच्या शेरोशायरीने आणली रंगत

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कवितांनी केली. ’मावळमध्ये जे फत्ते करणार आहेत जंग ते आहेत बारणे श्रीरंग’, ’आम्ही मारत नाही विनाकारण बढाई नरेंद्र मोदी जिंकणार लढाई’, ’शिवसेना, भाजपसोबत झेंडा माझा निळा त्यामुळे काँग्रेसच्या पोटात गोळा’, ‘शरद पवारांचा निर्णय झाला व्यर्थ का दिला या ठिकाणी पार्थ’, ’बारणे तुम्ही विजयासाठी होणार नाहीत लेट कारण तुमच्यासोबत आहेत रामशेठ’ अशा स्वकविता करून आठवले यांनी रंगत आणली. त्यांनी पुढे म्हटले की, सबका साथ सबका विकास या न्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केले आहे. देश एकसंघ ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी बाबासाहेबांच्या संविधानसुसार काम करीत असून, संविधानाचे रक्षण करण्याचेही काम करीत आहेत. त्यामुळे आंबेडकरी जनतेने काँग्रेस आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नयेे.

श्रीरंग बारणे चांगला, अ‍ॅक्टिव्ह, दिलदार माणूस आहे. त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर आहेत. त्यामुळे त्यांना घाबरायची गरज नाही. पार्थ पवारने पहिल्यांदा समाजकारण, राजकारण शिकायला पाहिजे होते. त्यानंतर उमेदवार म्हणून उभे राहायला पाहिजे होते. विनाकारण अजित पवारांच्या हट्टापोटी उमेदवारी लादली असल्याचे सांगून बारणे हे कसलेले पहेलवान आहेत. त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे, असा विश्वास ना. आठवले यांनी व्यक्त केला.

  • खासदार असावा तर श्रीरंग बारणेंसारखा : रामशेठ ठाकूर

खासदार श्रीरंग बारणे यांनी पाच वेळा संसदरत्न सन्मान प्राप्त केला आहे. खर्‍या अर्थाने त्यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामे आणि अनेक योजना राबवून न्याय दिला आहे. खासदार असावा तर श्रीरंग बारणेंसारखा. तुम्ही केलेल्या कामाच्या रूपाने तुम्ही हक्काने परत संसदेत जाणार, अशा शब्दांत त्यांच्या कामगिरीचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात कौतुक केले.

ते पुढे म्हणाले, देशात आणि राज्यात महायुती सरकारने केलेली कामे सर्वसामान्य जनतेच्या हिताची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला जागतिक स्तरावर बहुमान मिळवून दिला. जगात मानाचे स्थान प्राप्त करून दिले. एकीकडे देशाला सन्मान देणारी मोदींची युती; तर दुसरीकडे 56 पक्षांची खिचडी असलेली आघाडी आहे. कितीही पक्षांच्या आघाड्या होऊ द्या, मतदार जागरूक आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आणि देशाच्या विकासाला अधिक चालना मिळणार, असे सांगतानाच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना विजयी करा, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.

मोदी सरकारच्या कार्यकाळात युवक, महिला, ज्येष्ठांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, भारतातील प्रत्येक नागरिकामध्ये आत्मसन्मान निर्माण झाला आहे. पार्थ पवार मावळ मतदारसंघातील मतदारही नाहीत. त्यांचे मतदान बारामतीला, मग पवार फॅमिलीने त्यांना मावळमध्ये का उभे केले, असा सवाल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित करून थोडे दिवस थांबा, निवडणूक झाल्यावर पार्थ पवार पुन्हा बारामतीलाच जातील, असा टोलाही या वेळी लगावला.

  • धरणात मुतण्याची भाषा करणार्‍या अजित पवारांच्या मुलाला मत देणार का? : जगदिश गायकवाड

जगदिश गायकवाड यांनी अजित पवार यांच्यावर सणसणीत टीका केली. सिंचन घोटाळ्यामुळे कोकणात सिंचनाचे एक टक्काही काम झाले नाही, असे सांगून धरणात मुतण्याची भाषा करणार्‍या अजित पवारांच्या मुलाला मत देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येथे गुंडगिरी चालणार नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. आमदार मनोहर भोईर, बाळासाहेब पाटील, डॉ. कविता चौतमोल, दत्ता दळवी, सुशील शर्मा यांचीही समायोचित भाषणे झाली.

-पाच वर्षांच्या कालावधीतील विकासकामांचा आढावा मी आपल्यासमोर ठेवला आहे. सरकारच्या माध्यमातून कामे केली आहेत. त्यामुळे तुमच्या कृपेने मी पुन्हा जिंकणार आणि तुमच्या हक्काचा माणूस म्हणून मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणार आहे.

-खा. श्रीरंग बारणे, उमेदवार, मावळ लोकसभा मतदारसंघ

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply