पनवेल ः वार्ताहर
अल्पवयीन मुली व स्त्रियांकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या एका महिलेस कामोठे पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्या ठिकाणाहून दोन अल्पवयीन मुली व तीन स्त्रियांची सुटका केली आहे.
कामोठे परिसरात अल्पवयीन मुली व स्त्रियांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन पैशांसाठी त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती वपोनि स्मिता जाधव यांना मिळताच त्यांनी एक बनावट ग्राहक व दोन पंचांच्या साथीने खाजगी वाहनाने ऐश्वर्या हॉटेल, सेक्टर 20, कामोठे येथे सापळा लावून हा व्यवसाय करणारी महिला वैभवी चव्हाण (48) हिला ताब्यात घेतले. या वेळी तिने वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची नावे, तसेच तीन महिलांसंदर्भात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी या अल्पवयीन मुलींसह महिलांना ताब्यात घेतले आहे. या महिलेच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अनेक गुप्तपणे चालणारे वेश्याव्यवसाय उघडकीस येणार आहेत.