नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील ब्राह्मण सभा या संस्थेचा संगीत व नृत्य या संकल्पनेवर आधारित दीपसंध्या हा कार्यक्रम नुकताच झाला. नवीन पनवेल येथील फडके विद्यालयाच्या पटवर्धन सभागृहात कोरोना सुरक्षेचे नियम पाळून हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला उद्योजक श्रीपाद खेर, सुबोध व शुभांगी भिडे, मीना कानिटकर या प्रमुख पाहुण्यांसह ब्राह्मण सभेच्या अध्यक्ष दीपाली जोशी, सचिव मंजुषा भावे, खजिनदार वैशाली सरदेशपांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या वर्षभरात कोणतेही जाहीर सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकले नव्हते. त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये उत्साहाचे वातावरण होते.
सभेला संबोधित करताना श्रीपाद खेर म्हणाले, शॉर्टकट आणि झटपट पैसा ही निर्माण झालेली प्रवृत्ती नवीन पिढीसाठी घातक आहे. परिश्रम, जिद्द आणि विश्वास अंगी बाणवणे गरजेचे आहे. यासाठी देवावर श्रद्धा असावी. आपले जुने संस्कार जपताना नवीन विचारही आत्मसात करणे आवश्यक असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपल्या फसवणूक अथवा नुकसानीची भीती मनातून काढून टाकून उद्योगाभिमुख होण्याचे आवाहन त्यांनी तरुण पिढीला केले.
या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते झाला. त्यानंतर गायन, नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विजय मनोहर, श्रीकला जोशी व कश्मिरा देशपांडे यांनी गायन व नृत्यदिग्दर्शन केले. आभा वैद्य आणि वेधस अत्रे यांनी या कार्यक्रमाचे बहारदार निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
ब्राह्मण सभेचे पदाधिकारी, तसेच युवोन्मेष समूहाच्या सभासदांनी या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन केले. या कार्यक्रमापूर्वी ब्राह्मण सभेची सन 2020-21 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.