महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक क्षेत्र आणि सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. डम्परमधून उडणार्या व खड्ड्यांतून निघणार्या धुरळ्याचा खूप त्रास होत आहे. यामुळे येथे येणारे भाविक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.
पालीतून होणार्या अवजड वाहतुकीमुळे खड्ड्यांनी डोकं वर काढले आहे. शिवाय खड्ड्यात टाकलेली खडी व ग्रीट बाहेर येऊन खूप मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. डम्परमधूनही मोठ्या प्रमाणावर धुरळा उडत आहे. यावर काही ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी पालीतील नागरिक करीत आहेत.
खराब रस्त्यामुळे नवीन वर्षात बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची व खरेदीसाठी पालीत येणार्या नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. पाली स्टेट बँकपासून म. गांधी चौक, महावीर मार्ग ते थेट गणेश मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आगरआळी, सावंतआळी, रामआळी ते मधल्या आळीपर्यंतचा रस्ता, भोईआळी, मिनिडोअर स्टँड ते बसस्थानकपर्यंतच्या रस्त्याची मोठमोठ्या खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. त्याचबरोबर बल्लाळेश्वरनगर, धुंडीविनायकनगर व शिळोशी आणि मढाळी गावाकडे जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणावर फुटला आहे. काही ठिकाणचे रस्ते कित्येक वर्षे दुरुस्तही झाले नाहीत. शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यांवर अक्षरश तलावजन्य परिस्थिती दिसून आली होती. तीन-चार वेळा खडी व ग्रीट टाकून हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले होते, मात्र डंपर व अवजड वाहने गेल्याने खड्ड्यातील बारीक खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यावरून जाताना दुचाकी वाहने घसरतात. अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. येथील कुंभारआळीजवळ दुचाकीस्वार घसरून पडला. तर दोन महिन्यांपूर्वी एक शिक्षिका दुचाकीवरून खड्ड्यात आढळून पडल्या होत्या. यात त्यांना मुका मारदेखील लागला होता. असे अपघात वारंवार घडत आहेत. खड्डे व खडीमुळे पादचार्यांना चालताना कसरत करावी लागते.
विद्यार्थी, महिला व वृद्धांची तर खूपच गैरसोय होते. खड्ड्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडी देखील होत आहे. प्रत्येक जण या खराब रस्त्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.
उपाय कुचकामी
नगरपंचायतीतर्फे दोन-तीन वेळा येथील खड्ड्यात तात्पुरत्या स्वरूपात बारीक खडी व चुरा टाकून खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र सतत डम्पर व अवजड वाहनांची ये-जा होत असल्यामुळे खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आता तर हे खड्डे आणखी खोल व रुंद झाले आहेत. पालीतील रस्ते दुरुस्तीसाठी निधी आला आहे. आता आचारसंहिता आहे. नगरपंचायत निवडणुका झाल्यानंतरच याबाबत भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.
धुरळा व खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनचालकांची वाताहत होत आहे. येणारे भाविकदेखील त्रस्त आहेत. काही ठिकाणचे रस्ते कित्येक वर्षे दुरुस्तदेखील झाले नाहीत. पालीतील रस्ते लवकरात लवकर सुस्थितीत करणे आवश्यक आहे.
-बशीर परबळकर, नागरिक, पाली, ता. सुधागड
-धम्मशील सावंत, खबरबात