पनवेल : प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची तयारी महानगरपालिका करत आहे. कळंबोली येथील सिडकोच्या जम्बो फॅसिलीटी सेंटरची मनपा अधिकार्यांनी नुकतीच पाहणी केली. तेथील सोयी सुविधा पाहून ज्या सुविधांची कमतरता आहे त्यांची तातडीने पुर्तता करण्याच्या सुचना पाहणीदरम्यान मनपा अधिकार्यांनी सिडकोकडे केली.
कळंबोली येथील सिडकोच्या 72 खाटांच्या या जम्बो फॅसिलीटी सेंटरमध्ये 60 ऑक्सीजन सेवा देणारे बेडस् असून 12 आयसीयू बेडस् आहेत. यातील बारा बेडस् ना व्हेटिंलेटरची सोय करण्याविषयी पालिकेच्या वतीने सिडकोकडे मागणी करण्यात आली आहे. व्हेंटिलेटरबरोबर काही उपकरणांची मागणीही सिडकोकडे करण्यात आली.
सिडको जम्बो फॅसिलीटी सेंटर हे रुग्णालय महानगरपालिकेला काही आठवड्यामध्ये हस्तांतरण करणार आहे. खास कोरोनासाठी हे रुग्णालय राखीव ठेवण्यात आले आहे. महापालिकेचे उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त सचिन पवार, डॉ. पूनम जाधव, डॉ. वैभव जाधव यांनी ही पहाणी केली. सध्या सत्यम, सुश्रूत मल्टिस्पेशालिटी, निरामय, पॅनिसिया, सिध्दीविनायक, क्रिटीकेअर लाईफलाईन, प्राचीन, लाईफलाईन, वेंकटेश, मेट्रोकेअर, मोरे, एमजीएम, एकार, कळंबोली जम्बो सेंटर अशा रुग्णालयातील ठराविक बेडस् कोरोना रुग्णासांठी राखीव ठेवण्यात आले आहे.