Breaking News

रायगडात नऊ लाखांचा दारूसाठा हस्तगत

मतदानाच्या पूर्वसंध्येची घटना; सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. मतदानाच्या पूर्वसंध्येला व मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीला पूर्णपणे बंदी होती. या कालावधीत रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आठ लाख 81 हजार 132 रुपयांचा अवैध मद्यसाठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

मतदानाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मतदारांना दारूसारख्या वस्तूंचे अमिष दाखवले जावू नये, दारू पिऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडक कारवाईची भूमिका घेतली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागानेही दारूच्या विक्रीवर बंदी घातली होती, असे प्रकार करणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर होती. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांचीही कसून तपासणी केली जात होती. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनीही कठोर कारवाईचे आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी, कर्मचारी यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग, मांडवा, पेण, पोयनाड, वडखळ, नागोठणे, कोलाड, रोहा, श्रीवर्धन, दिघी सागरी, माणगाव, महाड या विभागात छापा कारवाईकरिता खास पथके तयार केली होती. अलिबाग, मांडवा पथकाचे नेतृत्व स्वतः पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांनी केले. या पथकाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वायशेत, मांडवा पोलीस ठाणे हद्दीतील साईबाबा नगर वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील वाशी, दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीतील दादर बस स्थानक, दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीतील बोर्लीपंचतन, महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बिरवाडी इत्यादी ठिकाणी एकाच वेळी बेकायदेशीर मद्यसाठा व मद्यविक्री होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून सुमारे आठ लाख 81 हजार 132 रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा हस्तगत केला व सहा जणांना ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.

मावळ मतदारसंघातील सोमवारी (दि. 29) होणार्‍या मतदान प्रकियेवेळीसुद्धा बेकायदेशीर मद्यसाठा व मद्यविक्री करणार्‍या इसमांवर त्याचप्रमाणे मतदान प्रक्रियेस घातक असे समाज विघातक कृत्य करणार्‍या समाजकंटकांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

-अनिल पारसकर, पोलीस अधीक्षक, रायगड

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply