नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
उतारवयातील जीवन हे रुक्ष जीवन हा समज दूर करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात हास्याचे आणि आनंदाचे क्षण निर्माण करावेत, या उद्देशाने सिडको अर्बन हाट येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी दादा-दादी डेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे वर्ष हे या कार्यक्रमाचे सलग तिसरे वर्ष आहे. रविवारी (दि. 21) सायं. 5 ते रात्री 9 या वेळेत अर्बन हाट येथे आयोजित करण्यात आलेल्या दादा-दादी डेमध्ये नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दादा-दादी डेनिमित्त आयोजित करण्यात आलेले ड्रम वादन, समूह नृत्य व गायन, सोलो डान्स असे विविध मनोरंजनपर कार्यक्रम ज्येष्ठांच्या चेहर्यावर हसू फुलवतील. खास ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणून अल्पोपहाराच्या घरगुती पदार्थांचे स्टॉल या दिवशी असतील, तसेच आरोग्य शिबिर, योगवर्ग, ध्यानधारणा हेही आहेतच. या दिवशी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शनही केले जाणार आहे, तसेच विमा क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जीवन विमा, आरोग्य विमा यांच्याविषयी माहिती सांगण्यात येईल. वकिलांचे कायदेविषयक मार्गदर्शन, मोबाइल आणि इंटरनेटच्या वापराविषयी मार्गदर्शन, संगीत आणि हास्य उपचार, उतारवयात करावयाचे व्यायाम अशा उपयुक्त मार्गदर्शनपर उपक्रमांचाही लाभ ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमात घेता येईल. अर्बन हाटच्या निसर्गरम्य आणि शांत परिसरात विरंगुळ्याबरोबरच मन:शांती असा दुहेरी लाभ होणार आहे. मनोरंजनपर कार्यक्रमांबरोबरच अर्बन हाटमधील वृक्षराजीच्या सहवासात दिवस घालवल्यानंतर मिळणारे समाधान ज्येष्ठ नागरिकांसाठी संस्मरणीय ठरेल. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, या हेतूने कार्यरत असणार्या हॅपी सिंगर्स ग्रुप यांच्या सहाय्याने दादा-दादी डेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या दादा-दादी डेमध्ये वाशी, पनवेल, खारघर परिसरातील सुमारे 100 ज्येष्ठ नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाकरिता सर्वांना प्रवेश नि:शुल्क आहे. अधिक माहितीकरिता आणि नोंदणीकरिता डी. के. शर्मा यांच्याशी 8108162660 या क्रमांकावर किंवा उज्ज्वला भट यांच्याशी 9820543964 या क्रमांकावर संपर्क साधावा.