प्राचार्य सदानंद धारप यांचे प्रतिपादन
पेण : प्रतिनिधी
आपल्या सभोवताली असणारी जैवविविधता जपणे ही काळाची गरज असून याबाबत जनमानसात प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पेण प्रायव्हेट हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी केले. पेण नगर परिषद सभागृहात जैवविविधता संगोपन व प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नगराध्यक्षा प्रितम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे, प्रशासकीय अधिकारी राजाराम नरुटे, अॅड. मंगेश नेने आदींसह नगरसेवक उपस्थित होते. यावेळी प्रोजेक्टरद्वारा माहिती देताना प्राचार्य धारप यांनी सांगितले की, पेण शहराच्या बाजूने वाहणार्या भोगावती नदीचे संगोपन होणे गरजेचे असून, त्यासाठी भोगावती पेण उत्सव असा उपक्रम सुरु करण्याची गरज आहे. या उत्सवाच्या माध्यमातून लोकांना आपल्या परिसरातील निसर्गाची माहिती देता येईल, असे ते म्हणाले. जैवविविधता संगोपन उपक्रमास पेण नगर परिषदेचा पाठिंबा असून यासाठी ज्या उपाययोजना राबवायच्या असतील त्यासाठी सहकार्य केले जाईल, असे नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी सांगितले.