पाली : प्रतिनिधी
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया अंतर्गत पेलोड क्युब्ज चॅलेंज 2021 या प्रकल्पाद्वारे सुधागड तालुक्यातील विवेक प्रदीप कोळी या बालवैज्ञानिकाने सर्वात कमी वजनाचा उपग्रह जेएसपीएम कॉलेज पुणे येथील कार्यशाळेत बनविला.
फेब्रुवारी महिन्यात तमीळनाडू रामेश्वरम येथून हा उपग्रह यशस्वी लाँचिंग करण्यात आला. त्यानंतर विवेकच्या या उपक्रमाने अनेक विक्रमाची नोंद केली आहे. जमिनीपासून 38 हजार मीटर उंचीवर हेलियमद्वारे सदर उपग्रह अवकाशात जाऊन वातावरणातील बदल टिपत आहे. यासाठी डॉ. मनीषा चौधरी व मिलिंद चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन विवेक याला लाभले. विशेष म्हणजे विवेकचे वडील प्रदीप कोळी व आई रागिणी कोळी हे सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. सर्वांना अभिमान वाटावा अशीच कामगिरी विवेक कोळी याने केली असून यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.