Breaking News

आजपासून फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांची प्रगणना

मुरूड ः प्रतिनिधी

फणसाड अभयारण्यात यंदा वन्यजीवांची प्रगणना ही जुजबी स्वरूपात होणार आहे. दरवर्षी प्राण्यांची प्रगणना करण्यासाठी पनवेल अथवा मुंबई येथील एनजीओ आमच्या मदतीसाठी येतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व भागात संचारबंदी असल्यामुळे फणसाड अभयारण्यात असणार्‍या उपलब्ध कर्मचारी वृंदाकडून सध्या वन्यजीवांची प्रगणना करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची प्रगणना जुजबी स्वरूपात होणार असल्याचे स्पष्ट संकेत फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी दिले आहेत. फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांची प्रगणना दरवर्षी बुद्धपौर्णिमेला होते. त्यानुसार या प्रगणनेला सुरुवात होत आहे. भोसले यांनी सांगितले की, फणसाड अभयारण्यातील 13 कर्मचारी पाण्याच्या ठिकाणी माची बांधून रात्र व दिवस असा पहारा करून वन्यजीवांची प्रगणना करणार आहेत. साधरणतः दोन-तीन दिवस हे काम सुरू राहणार असून प्रचलित नियमावलीनुसार प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झाला असून सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त आहे. मुरूड, रोहा व अलिबागच्या सीमारेषेचाही यात समावेश आहे. मुंबईपासून 154 किमी अंतरावर पनवेल, पेण व अलिबाग मार्गावरील विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदानच आहे. फणसाड अभयारण्यात बिबट्या, सांबर, भेकर, रानटी डुक्कर, शेकरू, खवल्या मांजर, माकड, हनुमान लंगूर, रानगवे, पिसोरी, मोर, ससा, घोरपड आदींसह इतर आकर्षक प्राणी आढळतात. मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरातील फणसाड अभयारण्यात 27 पाणवठे असल्याने वन्यजीवांना पाण्याची कमतरता नाही.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply