मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचा मनसुबा
कर्जत : बातमीदार
गेल्या दोन वर्षांमध्ये माथेरान स्वच्छ करण्यासाठी नगरपालिका वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरात आहे. प्लॅस्टिक, काच आणि पालापाचोळा याचे वर्गीकरण करून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी क्रशर मशीन, काचेच्या बाटल्यांची विक्री, व पालापाचोळ्याचे खत तयार करण्यास नगरपालिकेने सुरुवात केल्यामुळे माथेरात ‘कचरा मुक्त’ होऊन येथील डम्पिंग ग्राऊंड परिसर लवकरच मुलांना खेळण्यासाठी तयार होणार आहे.
मागील दोन वर्षात माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने स्थानिकांच्या मदतीने, क्लीन अप मार्शलच्या मदतीने, स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती व ती मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाली. शहरात गोळा केलेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येत होता व या कचर्याची विल्हेवाट लावणे हे एक अवघड काम नगरपालिकेसमोर होते. त्या वेळेस कर्जतचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी माथेरान नगरपालिकेचा अतिरिक्त चार्ज घेतला व त्यांनी डम्पिंग मुक्त माथेरानसाठी प्रयत्न सुरू केले.
सुरुवातीला सर्व कचर्याचे वर्गीकरण करून काच, प्लॅस्टिक, प्लॅस्टिक बॉटल वेगवेगळ्या करून त्यातील काचेच्या बाटल्यांची विक्री सुरू केली, तसेच प्लॅस्टिक बॉटल चपट्या करण्यासाठी बेल्लिंग मशीनचा उपयोग सुरू केला. या प्लॅस्टिकचे क्रश मशीनद्वारे छोटे तुकडे करून, त्याचा उपयोग रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. काचेच्या व प्लॅस्टिक बाटल्या विक्रीतून नगरपालिकेला 50 हजार रुपये महसूल मिळाला आहे व पालापाचोळ्यापासून खत निर्मिती झाली असून, या खताची हॉटेल व्यावसायिकांना स्वस्त दरात विक्री होणार आहे, तसेच पावसाळ्यामध्ये वृक्षारोपणादरम्यान या खताचा वापर होणार आहे. सध्या डम्पिंग ग्राऊंडवर फक्त खत असून, कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना यश आले आहे.
माथेरानचा अतिरिक्त पदभार स्वीकारल्यानंतर डम्पिंग ग्राऊंडचा आढावा घेतला, त्या वेळेस समजले की, डम्पिंग ग्राऊंड होण्याअगोदर येथे मुले खेळ खेळत असत, मात्र शहरातील सर्व कचरा या मैदानात संकलित झाल्याने मुले खेळापासून वंचित राहिली. त्याच वेळेस माथेरान डम्पिंगमुक्त करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार उपाययोजना केल्याने डंम्पिग ग्राऊंड 80 टक्के कचरामुक्त झाले आहे. तेथे तयार झालेले खत लवकरच हलवून तेथे मुलांना खेळण्यायोग्य मैदान तयार करण्यात येईल.
-रामदास कोकरे, मुख्याधिकारी