पनवेल ः वार्ताहर
पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत नैना क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आश्वासन सिडको नैनाच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे मुख्य नियंत्रक श्री. जाधव यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील नैना क्षेत्रात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या परिसरात असंख्य इमारती उभ्या राहिल्या असून अनेक बिल्डर्सनी नियम धाब्यावर बसवून बांधकामे केली आहेत, मात्र त्यावर सिडकोच्या नैना विभागाकडून कारवाई होत नाही, असा आरोप आहे. या बांधकामांवर कारवाई करण्यात यावी यासह नऊ मागण्यांच्या पूर्ततेसाठी काही जागृत ग्रामस्थ तसेच रहिवाशांनी आवाज उठविला आहे. या संदर्भात त्यांच्या नऊ मागण्या आहेत. यामध्ये नैनाच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे आजी माजी अधिकारी यांच्यावर शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात यावी, ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या नवीन बेकायदेशीर इमारत बांधकामांवर एमआरटीपी कायदा 53(7)नुसार तातडीने कारवाई करावी, ग्रामपंचायत हद्दीमध्ये बेकायदेशीर इमारत बांधकाम असलेल्या इमारतीमध्ये प्रत्यक्ष राहण्यास असलेल्या नागरिकांना संरक्षण देण्यात यावे, नैनाच्या बांधकाम परवानगीशिवाय असलेले कोणतेही दस्त नोंदवून घेऊ नये अशा सूचना देण्यात याव्यात, नैनामध्ये समाविष्ट केलेल्या गावामध्ये समक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेता बेकायदेशीर इमारत बांधकामे झालेली आहेत ती बांधकामे पाडून टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी, नैना परियोजनेच्या टीपीएस-7 या योजनेमध्ये शेतकर्यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आलेले आहे. त्यांना समाविष्ट करून घेण्यात यावे, नैना (ओसी)शिवाय देण्यात आलेल्या पाणीपुरवठा इलेक्ट्रिक जोडणी केलेल्या बांधकामावर आपले स्तरावर कारवाई करण्यात यावी, नैना हद्दीतील सर्व इमारत बांधकामांना इमारत बांधकाम परवानगी (सीसी)शिवाय व भोगवटा प्रमाणपत्र (ओसी)शिवाय विद्युतपुरवठा जोडणी तसेच एमआयडीसी, एमजेपी व ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा जोडणी देण्यात येऊ नये आणि नैना हद्दीतील बेकायदेशीर इमारत बांधकामांना सीसी-ओसीशिवाय गृहनिर्माण सोसायटी स्थापन न करण्याचे आदेश संबंधित सहाय्यक निबंधक, जिल्हा निबंधक यांना देण्यात यावे यांचा समावेश आहे. या मागण्यांसंदर्भात उसर्ली खुर्द ग्रामस्थांकडून सिडको नैना विभागास उपोषण करण्यासाठीची नोटीस देण्यात आली होती, मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे उपोषण करता आले नाही. कोरोनाची लाट सरल्यानंतर ग्रामस्थांनी दोन वेळा स्मरणपत्रे देऊन आपली मागणी लावून धरली. अखेर ग्रामस्थांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आले. या बैठकीस ग्रामस्थांकडून माजी सरपंच अॅड. विजय भगत, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पाटील तसेच देवेंद्र भगत, जयवंत भगत, मनोज भगत, रामचंद्र भगत, श्याम पाटील, तर सिडको नैनाकडून अतिक्रमणविरोधी विभागाचे मुख्य नियंत्रक श्री. जाधव, सहाय्यक नियंत्रक प्रमोद पाटील, सतीश मोरे उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अनधिकृत बांधकामांमुळे सिडको व पर्यायाने शासनाचा बुडणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल, बिल्डरने परवानग्या न घेतल्यामुळे रहिवाशांना होणारा त्रास, टाऊन प्लानिंगचे उडालेले तीनतेरा तसेच एखादी दुघर्टना घडल्यास होणारा संभाव्य धोका याविषयी अधिकार्यांना अवगत केले आणि तातडीने कारवाईस सुरुवात करावी, अशी मागणी केली. त्यावर कारवाईचे आश्वासन अधिकारीवर्गाने दिले, मात्र कारवाई न झाल्यास आम्ही उपोषण करू त्याचप्रमाणे उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करून आवाज उठवू, असा इशारा उसर्ली खुर्द ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सिडको नैना विभागास दिला आहे.