पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चैन स्नॅचिंगच्या घटना सुरुच असून या लुटारुंनी मागील काही दिवसांपासून पनवेल परिसरासह नवी मुंबईत हैदोस घातला आहे. या लुटारुंनी चार दिवसांमध्ये चार महिला व दोन पुरुष अशा सहा जणांच्या अंगावरील लाखो रुपये किंमतीचे दागिने लुटून नेले आहेत. या लुटारुंनी नेरूळ आणि सानपाडा भागात अवघ्या तासाभरात चार महिलांचे दागिने लुटल्याचे उघडकिस आले आहे. पोलिसांकडून या लुटारूंचा शोध घेण्यात येत असला तरी, या लुटारुंच्या कारवायात पुन्हा वाढ झाल्याने महिला वर्गात या लुटारुंची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. तर चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची झोप उडाली आहे. चेन स्नॅचिंग करणार्या लुटारूंनी गुरुवारी (दि. 26) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नेरुळ सेक्टर-21 मध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या बिंदु नायर (वय 46) या महिलेच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचुन पलायन केले. त्यानंतर या लुटारुंनी काही वेळातच नेरूळ सेक्टर-20 मध्ये मेघा बाजिराव पवार या महिलेच्या गळयातील 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचली. त्यानंतर लुटारूंनी जुईनगरच्या दिशेने पळुन जात सेक्टर-24 भागात मॉर्निंग वॉक करणार्या सुरेश जाना पाटील यांच्या गळ्यातील 75 हजार किमतीचे सोन्याचे लॉकेट खेचुन सानपाडाच्या दिशेने पलायन केले. त्यानंतर या लुटारूंनी सानपाडा भागात जाऊन डी-मार्टच्या पाठीमागील रोडवर मॉर्निंग वॉक करत असलेल्या मंजुळा राजु शेखर (वय 44) यांच्या गळ्यातील तब्बल 10 तोळे वजनाचे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पलायन केले. या सर्व घटनांची नेरूळ आणि सानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चेन स्नॅचिंग करणार्या याच लुटारुंनी शुक्रवारी (दि. 27) दुपारी छोटा खांदा गावच्या दिशेने पायी चालत जाणार्या स्वाती हनुमंत कदम (वय 48) या महिलेच्या अंगावरील 15 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र व पाच हजार रुपयांच्या नोटा असलेली पर्स खेचुन पलायन केले. या घटनेपाठोपाठ रविवारी (दि. 29)पनवेलच्या ओरियन मॉलमधुन पत्नीसह स्कुटीवरुन काळुंद्रे गाव येथे परतणार्या सागर गणेशकर (वय 27) या तरुणाच्या गळ्यातील 24 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन मोटरसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने लुटून पलायन केले. या दोन्ही घटनांची कामोठे आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपघातामुळे सापडला एक लुटारु दरम्यान, गत 28 ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पतीसह कोपरखैरणेतील गुलाबसन्स डेअरी जवळ शतपावली करण्यासाठी गेलेल्या जयश्री रामचंद्र शेडगे (वय 39) या महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन स्कुटीवरून आलेल्या लुटारूंनी लुटून पलायन केले होते, मात्र या वेळी शेडगे दाम्पत्याने आरडा-ओरड करत दोघा लुटारुंचा पाठलाग केल्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेली या लुटारुंची स्कुटी सेक्टर-15 मध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला धडकली. त्यामुळे दोघे लुटारु खाली पडल्याने स्कुटीवर पाठीमागे बसलेला लुटारु दागिने घेऊन पळून गेला. मात्र त्याचा साथिदार स्कुटी चालक राज सलीम शेख (वय 21) हा त्या भागातील नागरिकांच्या हाती लागला. त्यामुळे नागरिकांनी त्याची धुलाई करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.राज शेख याला जबरी चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून दागिने घेऊन पळुन गेलेल्या दुसर्या लुटारुचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील शेळके यांनी दिली.
दागिने लुटीच्या घटना
चेन स्नॅचिंग करणार्या लुटारुंनी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातदेखील विविध भागातील पाच महिलांच्या अंगावरील लाखो रुपये किमतीचे दागिने लुटून नेले आहेत. हे सत्र अद्याप सुरूच आहे. त्यामुळे चेन स्नॅचिंग करणार्या लुटारुंचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी महिलावर्गाकडून होऊ लागली आहे.