पेण : प्रतिनिधी
आरटीओ अधिकारी तसेच पेण नगर परिषद अध्यक्षा व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून, मिनिडोअरसाठी एसटी स्टँडसमोर विक्रम अधिकृत थांबा दिला जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी विक्रम मिनिडोअर संघटनेच्या प्रतिनिधींना दिली. शहरांतून ग्रामीण भागात सेवा देणार्या विक्रम मिनीडोअरसाठी एसटी स्टॅडसमोर अधिकृत थांबा द्यावा, अशी मागणी संघटनेच्यावतीने माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे. त्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे, भाजप पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील व संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली विक्रम चालक-मालकांनी माजी मंत्री रविशेठ पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत ते बोलत होते. पेण एसटी स्टँडसमोर भाजीमार्केट शेजारी मोकळ्या जागेत अनेक वर्षापासून टांगा, टॅक्सी थांबा आहे. आता टांगा, टॅक्सीची जागा विक्रम मिनिडोअरने घेतली आहे. पेणकरांना चांगली सेवा देण्यासाठी तेथे विक्रम मिनिडोअरसाठी नगरपालिकेने अधिकृत थांबा द्यावा, अशी विनंती चर्चेदरम्यान संघटनेच्या प्रतिनिधींनी केली होती. यावेळी रविशेठ पाटील यांनी आपण विक्रम मिनिडोअर चालक-मालकांसोबत असून त्यांना जिथे हवा आहे, तिथेच अधिकृत थांबा दिला जाईल असे सांगितले
विक्रम मिनिडोअरना पेण एसटी स्टँडसमोर अधिकृत थांबा देण्यासाठी नगराध्यक्षा तसेच नगर परिषद व आरटीओ अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाईल. सदर बैठकीत योग्य ती चर्चा करून याबाबतीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. -रविशेठ पाटील, माजी मंत्री