खारघर : प्रतिनिधी
तळोजा सेक्टर 10 मधील मैदानात पथदिवे बंद असल्यामूळे रात्रीच्या वेळी काही तरुण गांजा या अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे प्रकार सुरू आहे. या मैदानात खेळणी असल्यामुळे मुले खेळत असतात. अंधारात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोण जबाबदार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. सिडकोने तळोजा सेक्टर 10 प्लॉट नं. 113-114 या भूखंडावर खेळाचे मैदान विकसित केले आहे. परिसरात एकमेव मोठा मैदान असल्यामुळे परिसरातील मुलांची गर्दी असते. या मैदानातील खेळणी मोडकळीस आली आहे, तर मैदानात गवत वाढले आहे. मैदानात दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेले दिसून येते. मैदानात सिडकोने उभारलेले सर्व पथदिवे अनेक दिवसापासून बंद आहे. पथदिवे बंद असल्यामुळे अंधार पसरलेला असतो. अंधाराचा फायदा घेत काही तरुण रात्रीच्या वेळी मैदानातील बाकड्यावर काही तरुण गांजा या अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे दिसून आले. परिसरात एकमेव मैदान असल्यामुळे मुलेमुली खेळत असतात. अंधारात नशेबाजी करणार्या तरुणांकडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोण जबाबदार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करून तुडलेली खेळणी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याविषयी सिडकोच्या कळंबोली कार्यालयात विचारणा केली असता, तुटलेल्या खेळणी दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले. तर विधुत विभागात विचारणा केली असता, आठ दिवसांत बंद असलेले पथदिवे सुरू केली जातील, असे सांगितले.
तरुण मुले अमली पदार्थ सेवन करीत असल्याचे प्रकरण वाढत आहे. पालकांनीदेखील आपल्या मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच सिडको आणि पालिका प्रशासनाने समनव्यय साधून बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावे.
-प्रल्हाद केणी, रहिवासी आणि भाजप पदाधिकारी, तळोजा वसाहत
मैदानात असे प्रकार होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल. असे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावे.
-काशिनाथ चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळोजा