Breaking News

सिडकोकडून ‘नैना’साठी ‘यूडीसीपीआर’मधील तरतुदी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडको महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पाच्या जलद विकासासाठी, तसेच नजीकच्या काळात उदयास येणार्‍या नैना प्रदेशात व्यवसाय सुलभतेसाठी (इज ऑफ डुइंग बिझनेस) राज्य शासनाच्या एकात्मिक नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील (यूडीसीपीआर) काही मार्गदर्शक तरतुदींचा अंगीकार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे नैना प्रकल्पासह एकात्मिक नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील सर्वोत्कृष्ट तरतुदींची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे व या माध्यमातून अधिक व्यवहार्य प्रकल्प मार्गी लागतील व सर्वांगीण विकासास मदत होईल. तसेच दिनांक 3 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत राजपत्रात महाराष्ट्र प्रादेशिक प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमच्या कलम 37, उपकलम (1) अन्वये सर्वसाधारण जनतेच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी सूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचनेवर सर्वसाधारण जनतेच्या सूचना आणि हरकतींवर सुनावणीसाठी मुख्य नियोजनकार (नैना), एसपी (डीपी नैना) आणि एसपी (बीपी नैना) यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

सिडकोकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा भोवतालच्या प्रदेशात होणारी संभाव्य अनिर्बंध वाढ रोखण्यासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील 371 चौ. किमीच्या प्रदेशावर नैना प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. नैना प्रकल्पाची अंमलबजावणी एकूण 11 नगर रचना परियोजनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जमीन एकत्रीकरण प्रारूपावर हा प्रकल्प आधारित आहे. नैना अधिसूचित क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने या प्रदेशात नियमावली लागू करण्याची जबाबदारी सिडकोवर आहे. नैना प्रदेशातील भावी उद्योजकांना व्यवसाय सुलभतेचा लाभ व्हावा यासाठी यूडीसीपीआरमधील विशिष्ट तरतुदींचा नैना प्रकल्पामध्ये समावेश करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नैना प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसही मदत होणार आहे.

नैना हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असणार असून या शहरात व्यावसायिक आणि वाणिज्यिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर उदयास येणार आहेत. सिडको महामंडळ नैना क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे. यूडीसीपीआरमधील काही विशिष्ट तरतुदींचा नैना प्रकल्पामध्ये समावेश करण्याचा निर्णय सिडको संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे व यामुळे व्यवसाय सुलभता प्रदान होईल.

डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply