कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नेरळ परिसरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने नेरळ हॉस्पिटलला कोविड केअर सेंटरचा दर्जा देण्याची मागणी केली होती. दरम्यान, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी त्या अनुषंगाने नेरळ हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलचा दर्जा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नेरळ परिसरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असून, परिसरातील रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नेरळ शहरात कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन नेरळ हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख तसेच रायगड जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेऊन त्यांनादेखील पत्र दिले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी परिस्थितीची माहिती घेऊन रायगड जिल्हाधिकार्यांना सद्यस्थितीचा अहवाल सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी नेरळ हॉस्पिटलचे डॉ. कुणाल गुप्ता यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करून कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी नेरळ हॉस्पिटलने काम करावे, अशी शिफारस केली आहे. कर्जत भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर, तालुका सरचिटणीस राजेश भगत, भाजप किसान मोर्चाचे कोकण संयोजक सुनील गोगटे, भाजप प्रज्ञा प्रकोष्ठचे नितीन कांदळगावकर, नेरळ भाजपचे माजी अध्यक्ष अनिल जैन, अनिल पटेल आदी या वेळी उपस्थित होते.
नेरळ हॉस्पिटलला 20 बेडचे कोविड रुग्णालय म्हणून जिल्हाधिकार्यांकडून मान्यता देण्यात आली. आता नेरळकरांच्या सेवेत लवकरच नेरळ हॉस्पिटल कोविड रुग्णालय म्हणून सुरू होऊन कोरोना रुग्णांसाठी ते संजीवनी देणारे ठरणार आहे.
-डॉ. मुमताज खान, नेरळ हॉस्पिटल
भाजपच्या कामगिरीमुळे नेरळ शहरात कोविड रुग्णालय सुरू होणार असल्याने सर्व रुग्णांना याचा फायदा होणार आहे. नेरळ हॉस्पिटलला 20 बेडचे कोविड रुग्णालय म्हणून रायगड जिल्हाधिकार्यांकडून मान्यता देण्यात आली आहे.
-मंगेश म्हस्कर, अध्यक्ष, भाजप तालुका, कर्जत