Breaking News

नवी मुंबईत मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बैठक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे वतीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध करण्यात येणार्‍या विधानसभानिहाय मतदार यादीनुसार नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असल्याने या कार्यक्रमाबाबतची माहिती देणे व जनजागृती करण्याकरिता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध राजकीय पक्षांची बैठक महापालिका मुख्यालयात विशेष समिती कक्षात आयोजित करण्यात आली होती.

या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, निवडणूक विभागाचे उपआयुक्त अमरिश पटनिगेरे, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शीतल रसाळ, तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

30 नोव्हेंबरपर्यंत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून त्या अंतर्गत 1 जानेवारी 2022 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणार्‍या नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी अर्ज नमुना 6 भरून करून घ्यावी, तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीत नाव समाविष्ट नाही म्हणून मतदान करता आले नाही अशी स्थिती उद्भवू नये याकरिता मतदार यादीत आधीपासूनच नाव नोंदीत असलेल्या प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे हे गृहित न धरता आपले नाव असल्याची खातरजमा करून घ्यावी, असे आयुक्त बांगर यांनी या वेळी स्पष्ट केले. आपले मतदार यादीत नाव असल्याची खात्री करून घेणे अतिशय सोपे असून ुुु.र्पीीिं.ळप या पोर्टलवरून अगदी मोबाइलवरही आपले नाव शोधता येऊ शकते, असे आयुक्तांनी सांगितले.

छायाचित्रे नसलेली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 57 हजार नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली असून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे याची खात्री करून घेण्याचे सूचित करण्यात आले, तसेच अर्ज नमुना 6 नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, अर्ज नमुना 7 नुसार मतदार यादीतील नावास आक्षेप घेणे किंवा नाव वगळता येईल, अर्ज नमुना 8 नुसार मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये दुरुस्ती करता येईल तसेच अर्ज नमुना 8अ नुसार मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करता येईल असे स्पष्ट करीत मतदार यादीतील कोणतीही दुरुस्ती ही विहित नमुन्यातील अर्ज भरून कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्याची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत शहनिशा करूनच केली जाईल, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

या वेळी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींमार्फत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करीत मतदान यादी परिपूर्ण व सुव्यवस्थित करणे हे आपले सर्वांचे उद्दिष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त बांगर यांनी सर्व राजकीय पक्षांनी यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply