राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत पटकाविला द्वितीय क्रमांक
पनवेल : रामप्रहर वृत्त : आपली कला सादर करणार्या स्पर्धकांमध्ये असलेली प्रचंड चुरस, एकाहून एक बहारदार नृत्याविष्कार आणि प्रत्येक सादरीकरणाला रसिकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद, अशा जल्लोषमय वातावरणात नागपूर येथे झालेल्या ऑल इंडिया फोर्थ नॅशनल डान्स स्पर्धेत पनवेल तालुक्यातील मुलींनी बाजी मारत द्वितीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व गुणवंताचे अभिनंदन केले.
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशभरातून 400 स्पर्धक राज्याच्या उपराजधानी दाखल झाले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर करुन पनवेलच्या नृत्य आराधना कलानिकेतनच्या मुलींनी देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. ही स्पर्धा दि. 28 ते 31 जानेवारी दरम्यान झाली.
नृत्यसंस्कृती 2020 अंतर्गत अखिल नटराजम् आंतरसांस्कृतिक संघ, नागपूर आयोजित ‘ऑल इंडिया नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अॅण्ड फेस्टिव्हल’मध्ये पनवेल तालुक्यातील मुलींनी उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर करीत तालुक्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील नृत्य आराधना कलानिकेतनच्या मुलींनी देशात बाजी मारत द्वितीय क्रमांक पटकाविला. यातील श्रावणी थळे, सई जोशी, प्रणिता वाघमारे या पनवेलमधील सीकेटी हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. गेल्या आठ वर्षांपासून सीकेटी सेंटरमध्ये नृत्याचे क्लासेस सुरु आहेत.
या स्पर्धेत तनया घरत आणि उत्तरा नलावडे यांनी सिनिअर ड्यूएट गटात प्रथम क्रमांक, सई जोशी ज्युनिअर सोलो डान्समध्ये प्रथम क्रमांक, तनया घरत सोलो डान्समध्ये सिनिअर द्वितीय क्रमांक, समूह गटात नृत्य आराधना कलानिकेतन ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकाविला. या ग्रुपमध्ये उत्तरा नलावडे, वैखरी पोटे, सई जोशी, प्रणिता वाघमारे, श्रावणी थळे, वैदही तुळस्कर, नित्या पाटील यांचा समावेश होता. तर वैखरी पोटे ज्युनिअर सोलो डान्स स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व स्पर्धकांना त्यांच्या गुरु अॅड. दीपिका मनीष सराफ यांचे महत्त्व पूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांचाही या वेळी बेस्ट कोरिओग्राफर म्हणून नृत्याविष्कार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संपूर्ण स्पर्धेत विविध प्रकारांत नृत्य आराधना कलानिकेतनच्या मुलींनी बक्षिसांची अक्षरशः लयलूट केली.