सोन्या-चांदीच्या दागिन्यासह भांडी घेऊन फेरीवाल्या महिला फरारी

कर्जत : बातमीदार
जुनी भांडी नवीन करून देतो, असे भासवून दोन फेरीवाल्या महिलांनी नेरळ मोहाचीवाडी (ता. कर्जत) गावातील 15 महिलांची फसवणूक केली. तसेच गावातील काही महिलांचे सोन्याचांदीचे दागिने घेऊन या फेरीवाल्या महिला फरार झाल्या आहेत. याबाबत काही ग्रामस्थ महिलांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
डोक्यावर भांडी घेऊन कर्जत तालुक्यात गावोगावी फिरणार्या दोन महिलांनी (सासू-सुन) नेरळ मोहाचीवाडीमधील अनेक महिलांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सर्वप्रथम या फेरीवाल्या सासू – सूनांनी मोहाचीवाडीतील महिलांना बोलण्यातच गार करून विश्वास संपादित केला. जुनी भांडी घेऊन त्या नवीन भांडी देऊ लागल्या. त्या बदल्यात या सासू, सूना ग्रामस्थ महिलांकडून 30 ते 40 रुपये घेत होत्या. त्यानंतर तुमचे दागिने छान आहेत, फोटो काढून ते परत आणून देतो, असे सांगून त्या दोघींनी मोहाचीवाडी गावातील तब्बल 15 महिलांकडून भांडी, सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला.
या प्रकरणी मोहाचीवाडी गावातील काही महिलांनी नेरळ पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.