पाली : प्रतिनिधी
अष्टविनायकांपैकी एक स्थळ असलेल्या पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 23) भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
धार्मिक स्थळे, मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंगळवारी पालीमध्ये गर्दीचा उच्चांक गाठला. मुबंई, ठाणे, पुणे आदी शहरांतील भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. त्यांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
बल्लाळेश्वर मंदिर परिसरातील हॅाटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले जय्यत तयारीत होते. परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
वाहतूक कोंडी
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दीड-दोन वर्षानंतर मंदिर सुरू झाल्याने बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. पर्यटकदेखील मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे व्यवसायदेखील चांगला झाला.
-अमित वरंडे, व्यवसाईक, पाली, ता. सुधागड
बल्लाळेश्वर मंदिर व परिसर भाविकांनी फुलून निघाला आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी शुद्ध थंड पाणी व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलिंग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने उभी करण्यासाठी दोन मोफत वाहनतळ उपलब्ध आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
-अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली