Breaking News

लोकसेवेचं संचित म्हणजे दि. बा. पाटील

  • प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल

नवी मुंबई हे नाव डोळ्यापुढे आल्यावर टोलेजंग इमारती, नियोजनबद्ध रस्ते डोळ्यापुढे येतात. संपत्ती आणि सुबत्तेच्या या डोळे दिपवणार्‍या महानगरीच्या निर्मितीसाठी रायगड व ठाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केलेला त्याग क्वचितच सर्वांच्या लक्षात असेल. 21व्या शतकाच्या प्रारंभी सिडकोने उभारलेले नवी मुंबई शहर भव्य जरूर आहे, मात्र या शहराखालच्या जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी सर्वसामान्य शेतकर्‍यांना पोलिसांच्या लाठ्या-काठ्या अनेक वेळा झेलाव्या लागल्या. प्रसंगी अनेक भूमिपुत्रांचे रक्त सांडले. अशा या संघर्षाच्या प्रत्येक प्रसंगात रायगड आणि ठाणे जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब…
एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी पनवेल, उरण, नवी मुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे, कष्टकरी जनतेचे, मच्छीमारांचे, सर्वसामान्य कामगारांचे प्रश्न पोटतिडकीने शासनदरबारी मांडून ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. विधानसभा, विधान परिषद तसेच लोकसभेपर्यंत सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून कार्य केले, असे लढवय्ये लोकनेते दि. बा. पाटील यांनी आपल्या पनवेल विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधित्व केले आहे, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. पुढे याच पनवेलचा लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची मलादेखील संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो. लोकांच्या पाठिंब्यामुळे ‘लोकनेते’ ही बिरूदावली मिळालेले पाटीलसाहेब खर्‍या अर्थाने ‘लोकनेते’ होते यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत आहे.
पाटीलसाहेबांचे आपल्या परिसरासाठी खूप मोठे कार्य आहे. जनतेच्या सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या पाटीलसाहेबांनी जनतेसाठी सतत संघर्ष केला. ते नेहमी म्हणत असतं, आपल्या कष्टकरी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांसाठी आंदोलन करताना मला मरण जरी आले, तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन! त्यांचे आयुष्यभराचे लोकसेवेचे संचित (पुण्य) त्यांनी आपल्या लोकांच्या सेवेसाठी खर्ची घातले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लोकसेवा केली. त्यामुळे समाज म्हणून आणि त्यांनी उभारलेल्या व घडवलेल्या पनवेल-नवी मुंबई परिसरातील सुजाण नागरिक म्हणून आपणदेखील त्यांचे देणे लागतो. पाटीलसाहेब आपल्यातून निघून गेले असले तरीही त्यांचे नाव अजरामर रहावे, आपल्या भागाचा इतिहास घडवणारी ही व्यक्ती होती हे भविष्यातील पिढ्यांना लक्षात रहावे तसेच ही बाब इतरांनासुद्धा स्फूर्तिदायक ठरावी यासाठी भूमिपूत्र असलेल्या लोकनेते दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव त्यांच्याच कर्मभूमीत, नवी मुंबईत नावारूपास येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे योग्य ठरेल, अशी भावना सर्वसामान्य जनतेची आहे. त्या अनुषंगाने सरकारदरबारी मागणी होत येत असून या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी सर्व पनवेलकरांनी तसेच नवी मुंबईतील नागरिकांनी पाठिंबा द्यावा, अशी माझी विनंती आहे.
वर्तमानात राहून भविष्यातील पिढ्यांना आपल्या इतिहास पुरुषांचा ऐतिहासिक वारसा जपण्याची संधी देण्याची योग्य वेळ आपल्यासमोर आलेली आहे. लोकनेते दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा लोकाग्रह आहे. त्यासाठी रायगडसह पनवेल, उरण, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, भिवंडी आणि कल्याणमध्ये चळवळ उभी रहात आहे ज्यामध्ये प्रत्येकाने सक्रीय सहभाग घेऊन स्वतःचे मत व्यक्त करणे अपेक्षित आहे. कारण हीच आपल्या लोकनेत्यास खरी आदरांजली ठरणार आहे!
राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याच्या लोकनेते दि. बा. पाटीलसाहेबांच्या कार्यपद्धतीला पाहतच आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा लोकप्रतिनिधी कसा असावा असे कोणी विचारले तर त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय लोकनेते पाटीलसाहेब होते. सामाजिक प्रश्नांवरील त्यांची पकड, लोकभावनांची जाण तसेच संसदीय कार्यप्रणालीचा त्यांचा दांडगा अनुभवच त्यांच्यातील वेगळेपण सांगून जातो.  
लोकनेते पाटीलसाहेबांना महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक तसेच विकासात्मक प्रश्नांची जाण होती. नवी मुंबईच्या उभारणीसाठी ज्या शेतकर्‍यांनी आपल्या पिकत्या जमिनी सरकारला देऊन मोठा त्याग केला त्या शेतकर्‍यांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या, भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी पाटीलसाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. वयाच्या 87व्या वर्षीदेखील स्वतःच्या ढासळत्या प्रकृतीची पर्वा न करता त्यांनी स्ट्रेचरवर येऊन प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते, हा इतिहास विसरून चालणार नाही.
आजच्या घडीला ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती’च्या माध्यमातून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव द्यावे यासाठी सर्वांनी पुढाकार घेतलेला आहे. पनवेलचा लोकप्रतिनिधी म्हणून मीदेखील यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या सोबत समर्थपणे उभा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या पाटीलसाहेबांचे नाव विमानतळाला देण्यात यावे यासाठी आपल्या परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्तेदेखील आग्रही आहेत. कारण त्यांच्या प्रयत्नांमुळेच भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला असताना नवी मुंबईतील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे लोकभावनेचा आदर करून राज्य सरकारने नवी मुंबईतील विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय घ्यावा, अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे.
विधानसभेचे पाच वेळा आमदार व दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या दि. बा. पाटीलसाहेबांनी विधिमंडळासह संसदेत सामान्य माणसाचे अनेक प्रश्न मुद्देसूदपणे मांडले. ते मांडताना त्यांची आक्रमकता, सामाजिक भान आणि वास्तवाची जाणीव महत्त्वाची होती. त्यामुळे अशा सामान्यातील असामान्य असलेल्या लोकप्रतिनिधीचे नाव सर्वश्रुत व्हावे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अजरामर रहावे यासाठी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव द्यावे, अशी मागणी आम्ही सर्व करीत आहोत. हीच पाटीलसाहेबांना अवघ्या महाराष्ट्राकडून खरी श्रद्धांजली ठरेल!

Check Also

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली …

Leave a Reply