उरण : वार्ताहर
थंडीची चाहूल लागताच उरण परिसरातील विस्तीर्ण जलाशये, समुद्री खाड्या तसेच समुद्र खाडी किनार्यावर विविध स्थलांतरीत जलचर पक्षांची गर्दी वाढली आहे. या विविध प्रकारच्या आकर्षक पक्षांमध्ये अग्निपंखी, पेलिकन, करकोचा, सिगल आदी स्थलांतरित पक्षांबरोबरच काही दुर्मीळ पक्षांचाही समावेश आहे. उरण परिसरातील पाणजे, डोंगरी, बेलपाडा, दास्तान फाटा, रांजणपाडा, जसखार, बोकडवीरा-बीपीसीएल, नवीन शेवा आदी परिसरातील खाड्या, पाणथळी जागा, जलाशये आणि करंजा, पीरवाडी, माणकेश्वर, मोरा, खोपटा, घारापुरी, जेएनपीटी परिसरातील सागरी किनारे विविध प्रकारच्या आकर्षक जलचर पक्षांनी गजबजून गेले आहेत. यामध्ये नीलबदक, पाणकोंबड्या, पाणकावळे, बगळे, सफेद व काळे करकोचे, खंड्या, शेकाट्या, पाणटिवळा, सारस आदी स्थानिक जलचर पक्षांबरोबरच अग्निपंखी, पेलिकन, करकोचा, सिगल आदी स्थलांतरित पक्षांचाही समावेश आहे. मागील दोन वर्षांपासून मोठ्या संख्येने दिसणार्या अग्नीपंखी (फ्लेमिंगो) पक्ष्यांची संख्या चांगलीच रोडावली होती. सातत्याने बदलत्या हवामानाचा परिणाम होत असल्यानेच अग्नीपंखींची संख्या कमी झाली असल्याचे पक्षीप्रेमींकडून सांगितले जात होते, मात्र काही पर्यावरण प्रेमी संस्थांच्या प्रयत्नानंतर येथील समुद्र खाड्या, पाणथळी क्षेत्रातील काही कंपन्यांनी बंद केलेले समुद्राच्या पाण्याचा प्रवाह पुन्हा एकदा सुरू झाला आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी आवश्यक पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील परिसरात विविध आकर्षक स्थलांतरित पक्षांची गर्दी वाढत चालली असल्याची माहिती श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली. उरणमधील समुद्र किनार्यांवरील वाळुवरही विविध प्रकारचे जलचर पक्षी मोठ्या प्रमाणात नजरेत पडु लागले आहेत. या विविध आकर्षक पाहुण्या पक्ष्यांची गर्दी परिसरात वाढली आहे. परिसरातील पाणथळी जागा, खाडी, किनार्यांवर स्वैरविहार करणार्या रंगीबेरंगी विविध जातीच्या आकर्षक जलचर पक्ष्यांच्या मनमोहक हालचालींने परिसरातील वातावरणही चांगलेच प्रफुल्लीत झाले आहे.