कर्जत : बातमीदार
कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर डिकसळ ते चारफाटा या दरम्यान पोलीस बीट सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांनी ही मागणी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे केली आहे.
माथेरान या पर्यटन स्थळाकडे जाणार्या आणि कर्जत तालुक्यातून ठाणे-मुंबई कडे जाणार्या कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. त्याच वेळी कर्जत आणि नेरळ पोलीस ठाणे यांची सीमा असलेल्या या परिसरात भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन असून या परिसरात सतत चोरीच्या घटना घडत असतात आणि अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी, ग्रामस्थ आणि वाहनचालक यांना दिलासा देण्यासाठी रायगड पोलिसांनी कर्जत आणि नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी उभारावी. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसेल आणि अपघात घडत असताना मदत करणे सोपे होऊ शकते. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्याकडून ही मागणी करण्यात आली आहे.
रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्याकडून रायगड जिल्हा पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांना देण्यात आली. या वेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे सरचिटणीस अॅड. सुशील महाडिक, उमरोली ग्रामपंचायत सदस्य भास्कर लोंगले, संदीप मोरे, रूपेश मोरे, योगेश थोरवे, विक्रम मोरे आदी उपस्थित होते. सदर मार्गावरील विविध कॉम्प्लेक्समध्ये पोलीस गस्त वाहनद्वारे दिवसातून कमीत कमी दोन वेळा पाहणी करावी, अशी मागणी बहुजन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.