पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पाली तहसील कार्यालयाबाहेर रस्त्यावर रात्री काही तरुणांना एक भरकटलेले कासव दिसले. या तरुणांनी ताबडतोब शिवऋण प्रतिष्ठान या व्हॉट्सअप ग्रुपवर ही माहिती कळवली व कासवाला वाचविण्याचे आवाहन केले. त्यानंतर पालीतील शंतनु लिमये या प्राणीमित्र युवकाने तेथे जाऊन कासवाला ताब्यात घेतले. त्यानंतर या कासवाला सुरक्षितपणे विहिरीमध्ये सोडले, अशी माहिती शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्रचे उपाध्यक्ष केतन म्हस्के यांनी दिली.
शिवऋण प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक व सेवाभावी कार्यात अग्रेसर राहिले आहे, सजीव व जीवसृष्टी टिकली पाहिजे यासाठी पदाधिकारी महत्त्वपूर्ण काम करतात. दयानंद माने, अमोल त्रिभुवन व त्यांच्या सहकार्यांना हे कासव दिसले होते. वाहनांच्या धडकेत किंवा इतर प्राण्यांच्या आक्रमणामुळे या कासवाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान दाखवून ही माहिती सोशल मीडियावर कळवली. त्यानंतर लागलीच चांगला प्रतिसाद मिळाला व कासवाचे प्राण वाचू शकले.