आता सुनावणी 30 नोव्हेंबरला
पनवेल : प्रतिनिधी
बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर निकाल देण्यापूर्वी सरकारी वकिलांचे म्हणणे न्यायालय ऐकून घेणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता 30 नोव्हेंबर रोजी होणार असून तोपर्यंत विवेक पाटील यांना आणखी पाच दिवस कोठडीतच काढावे लागणार आहे.
न्यायालयासमोर या प्रकरणी आपले म्हणणे मांडण्यासाठी ‘ईडी’च्या वकिलाने वेळ मागितली आहे. त्यामुळे न्यायालयाने आता पुढील सुनावणी 30 नोव्हेंबर रोजी होईल असे सांगितले. त्यावेळी सरकारी वकील आपले म्हणणे मांडून जामीनाला विरोध करतील, असे समजते. विवेक पाटील यांच्या वकीलांनी जामीनाबाबत विवेक पाटील यांची बाजू आतापर्यंतच्या वेळोवेळी झालेल्या सुनावणीत मांडली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळा, भ्रष्टाचार प्रकरणी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्याविरोधात 12 ऑगस्ट 2021 रोजी आरोपपत्र दाखल केले होते . विवेक पाटील यांचे वकील अशोक मुदरंगी यांनी 11 ओक्टोबर रोजी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला. त्यावर 14 ओक्टोबर पासून सुनावणी सुरू होती. गुरुवार 16 नोव्हेंबर रोजी विवेक पाटील यांच्या वकीलांचा युक्तिवाद संपल्यावर त्यांच्या जामीन अर्जावर 25 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने निर्णय देण्याचे जाहीर केले होते. मात्र, आज झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने जामीन अर्जावर 30 नोव्हेंबर रोजी निर्णय देण्यात येईल असे जाहीर केले.