Breaking News

आसल ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? चढ्या दराने वस्तूंची खरेदी; कोकण आयुक्तांकडे तक्रार

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीत थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामनिधी आणि 14व्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या अन्य सहा सदस्यांनी केला आहे. या सहा सदस्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे याबाबतची तक्रार केली आहे.दरम्यान, पिण्याच्या पाण्याचे जलशुद्धिकरण संच, ई-लर्निंग संच, शैक्षणिक साहित्य, शाळांचे बेंचेस, स्ट्रीट लाइट खरेदी आणि अंगणवाडी पोषण आहाराच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या लेखी तक्रार अर्जात केला आहे.

कर्जत-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या आसल ग्रामपंचायतीत थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच रमेश लदगे काम पाहत आहेत. त्यांच्यासोबत निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचे तीन सदस्य निवडून आले असून विरोधी पॅनलचे सहा सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे आसल ग्रामपंचायतीत विकासकामांत सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय दिसून येत नाही. परिणामी ग्रामपंचायतीचा गाडाही व्यवस्थित हाकला जात नाही. ग्रामपंचायतीतील कोणतीही विकासकामे आणि आवश्यक वार्षिक वस्तू खरेदीत सरपंच आणि बहुमत असलेल्या गटाकडून एकमत होत नाही. त्यातून सरपंच रमेश लदगे यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदाराकडून वस्तूंची खरेदी केली, मात्र ती खरेदी कागदोपत्री असून प्रत्यक्षात त्यातील अनेक वस्तू या ग्रामपंचायत कार्यालयात पोहचल्याच नाहीत. तरीही सरपंच लदगे यांनी वस्तू खरेदी केल्याबद्दलचे धनादेश मात्र ठेकेदाराला दिले आहेत, असा प्रमुख आरोप सहा ग्रामपंचायत सदस्यांचा आहे. बाजारात त्या वस्तूंची किंमत कमी असून चढ्या भावाने वस्तूंची खरेदी करून सरपंच आणि ग्रामविकास अधिकार्‍यांनी ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप ग्रामपंचायत उपसरपंच उमेश गायकवाड, सदस्य नंदिनी शेंडे, करुणा ठाकरे, मंदा कदम, वनिता वारघडे आणि मंजुळा घोगरकर यांनी कोकण आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

कोकण आयुक्तांकडे केलेल्या तक्रार अर्जात सहा ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सरपंच आणि ग्रामविकास अधिकार्‍यांवर केला आहे. आसल ग्रामपंचायतीतील जिल्हा परिषद शाळेत लावण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे पाच जलशुद्धिकरण संच खरेदी केले आहेत. त्यासाठी तीन लाखांचे बिल मे 2020मध्ये अदा केले असून त्या वस्तू अद्याप ग्रामपंचायतीत पोहचल्या नाहीत. जिल्हा परिषद शाळेत ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 80 हजारांचा खर्च एक संच विकत घेण्यासाठी केला, पण त्या संचाची कार्यालयात आणल्याबद्दलची नोंद नाही. 70 हजारांचे शैक्षणिक साहित्य खरेदी केले असून जिल्हा परिषद शाळांसाठी आणि अंगणवाडी शाळांसाठी बेंचेसही खरेदी केले आहेत. त्यासाठी चार लाख 79 हजारांचे बिल अदा करण्यात आले, मात्र हे साहित्य दोन महिन्यांनंतरही पोहचले नाही. वडवली व आसल येथे लावण्यासाठी स्ट्रीट लाइट खरेदी केले. त्यासाठी जवळपास दोन लाख रुपये ठेकेदारास अदा केले आहेत, तर ग्रामपंचायत हद्दीतील सात अंगणवाडी शाळांसाठी पोषण आहार खरेदी केला. त्यासाठी सव्वादोन लाखांचे बिल अदा केले आहे. त्यातील शेंगदाणा चिक्की व राजगिरा लाडूचे वाटप सरपंचांनी परस्पर केले असून प्रोटिन पावडर अजून आलीच नाही, परंतु त्याचे बिल ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकार्‍यांच्या सहीने काढलेल्या धनादेशाद्वारे ठेकेदाराला देण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व वस्तूंच्या खरेदी व्यवहारात पारदर्शकता नसल्याने भ्रष्टाचार व शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आसल ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी केला आहे.

सर्व वस्तू एकाच ठेकेदाराकडून चढ्या भावाने खरेदी केल्या आहेत. बाजारात कमी भावात या वस्तू मिळत असताना ग्रामपंचायतीचे नुकसान करून वस्तूंची खरेदी केली आहे. त्याच वेळी मे महिन्यात त्या सर्व वस्तूंच्या खरेदीबद्दल धनादेश देण्यात आले आहेत, मात्र त्यातील बहुतांश वस्तू अद्याप ग्रामपंचायतीकडे पोहचल्याच नाहीत.

-उमेश गायकवाड, उपसरपंच

ठेकेदार कंपनी म्हणून आम्ही कृष्णा आर्ट्सला या सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी धनादेश दिला आहे. त्या माध्यमातून बदलापूर येथील ठेकेदाराला पैसेदेखील अदा झाले आहेत, मात्र सदर वस्तू अद्याप पोहचल्या नाहीत हे सत्य आहे.

-एस. पी. पाटील, ग्रामविकास अधिकारी

आम्ही सर्व सदस्यांनी मिळून आवश्यक वस्तू खरेदीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ठेकेदार नेमून आपण कामाचे आदेश दिले होते. त्याबदल्यात चेकद्वारे पैसेही दिले आहेत, मात्र त्या सर्व वस्तू आमच्याकडे प्राप्त झाल्या नाहीत. याबाबत आम्ही ठेकेदाराला पत्र देऊन सर्व वस्तू आणून देण्याची आणि त्याचा पंचनामा करण्याची सूचना केली आहे. आठ दिवसांत सर्व माल आल्याची खात्री झाली नाही, तर ग्रामपंचायत त्या ठेकेदार असलेल्या पुरवठादारावर केस दाखल करेल.

-रमेश लदगे, सरपंच

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply