मुंबई ः प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलत ओबीसी संवर्गातील जागांवर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. राज्यातील 106 नगरपंचायतींमध्ये एकूण एक हजार 802 जागांसाठी निवडणूक होणार होती. यापैकी ओबीसींच्या 344 जागांवरील निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. त्याचबरोबर इतर ओबीसी जागांवरील निवडणुकांनाही स्थगिती देण्यात आली आहे.
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही. या अध्यादेशाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. यानंतर विरोधी पक्षातील नेते राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य करीत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील चार रिक्तपदांच्या आणि चार हजार 554 ग्रामपंचायतींमधील सात हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, मात्र यातील ज्या जागांवर ओबीसी आरक्षण आहे त्या जागांवरील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, इतर प्रवर्गातील जागांवर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच निवडणुका होणार आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …