नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईतील वाशी येथे राहणार्या अन्वय दंडवते याची अखिल भारतीय सैनिकी शाळेत निवड झाली आहे. या परीक्षेला दरवर्षी राज्यात 10 ते 15 हजार विद्यार्थी बसतात तर दोन लाख विद्यार्थी देशभरात प्रवेश परीक्षा देत असतात. सैनिकी शाळेत प्रवेश मिळवताना असलेली प्रवेश परीक्षा ही कठीण मानली जाते. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी दररोज 12 ते 14 तास अभ्यास व 100 पेक्षा जास्त पेपर सोडवत अन्वय ने मिळवलेले या यशाचे महत्त्व लक्षात येते. अन्वयचे वडील अभिलाष दंडवते हे इंजिनीअर असून आई सीमा दंडवते या गृहिणी आहेत. या दोघांनी आपल्या व्यस्त वेळातून अन्वयच्या स्वप्नांना उभारी दिल्याने अन्वय ही कठीण प्रवेश परीक्षा पास होऊ शकला. भारतात अवघ्या 33 सैनिकी शाळा आहेत. समाजातील सर्व स्तरातील व देशाच्या सर्व भागातील लोकांना सैन्यदलात अधिकारी होता यावे म्हणून भारत सरकारने संरक्षण खात्याच्या अधिपत्याखाली देशाच्या निरनिराळ्या भागात नॅशनल डिफेन्स अकॅडमी प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणार्या संस्था सुरू केल्या आहेत. राज्यात सातारा व चंद्रपूर अशा दोन ठिकाणी सैनिकी शाळा आहेत. अन्वय सध्या सहावीत असला तरी त्याने देशसेवेत सहभागी होण्याची जिद्द मनाशी बाळगलेली आहे. अन्वयची सैन्यात जाण्याची इच्छा पाहता त्याच्या आईवडिलांनी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट माहिती घेतली. ऑनलाइन क्लासेस चालू केले व नंतर जवळपास अडीच महिने तळेगाव दाभाडे पुणे येथे त्यास तयारी करण्यासाठी अन्वय राहिला होता. तिथून अन्वयची निवड चंद्रपुर सैनिकी शाळेत निवड झाली. यापूढे अन्वय 12 वी पर्यंत चंद्रपूरच्या सैनिकी शाळेत शिक्षण घेत सैन्याचे व देशभक्तीचे धडे गिरवणार आहे. त्याला आय कॅन ट्रैनिंग इन्स्टिटयूटचे देशमुख व गजानन गोरे या दोन्ही शिक्षकांचे कायम सहकार्य लाभले. अन्वयच्या या यशामुळे नवी मुंबईत सर्व स्थरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.