कर्जत ः बातमीदार
मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेसेवा चांगली व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. त्याचवेळी नेरळ आणि माथेरान ही दोन्ही स्थानके लोणावळा स्थानकाप्रमाणे पर्यटन रेल्वे स्थानके जाहीर केली आहेत. या स्थानकांचा कायापालट पुढील काळात पूर्ण होईल, असा आशावाद खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. दरम्यान, लोकांची पाच वर्षे सेवा केली म्हणून लोकांनी आपल्याला पुन्हा निवडून दिले असून महायुतीचे कार्यकर्ते आपल्या विजयाचे शिल्पकार असल्याचेही खासदार बारणे यांनी जाहीर केले. नेरळ येथे शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव, आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप, नागरिकांना छत्रीवाटप आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी खासदार श्रीरंग बारणे बोलत होते.
नेरळमधील बापूराव धारप सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला खासदार बारणे यांच्यासह माजी आमदार देवेंद्र साटम, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, शिवसेना मतदारसंघ संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, तालुका संघटक राजेश जाधव, भाजप तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, आरपीआय तालुका अध्यक्ष राहुल डाळिंबकर, कर्जत पंचायत समिती सभापती राहुल विशे, क र्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, माथेरान नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सहारा कोळंबे, भाजपचे नितीन कंदळगावकर, राजेश भगत, वर्षा बोराडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबू घारे, दिलीप ताम्हाणे आदींसह कर्जत पंचायत समिती सदस्य सुजाता मनवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते नेरळ परिसरातील दहावी आणि बारावीमधील विविध शाळांमध्ये पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नेरळमधील वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या डॉक्टरांचादेखील विशेष सत्कार करण्यात आला. महायुतीच्या वतीने नेरळमधील गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप आणि गरीब कुटुंबांना धान्यवाटप तसेच सर्व उपस्थितांना छत्रीवाटप करण्यात आले.