कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वे प्रशासनाने मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ अशी प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी नॅरोगेज ट्रॅकची दुरुस्ती सुरू आहे, मात्र सोमवारी (दि. 6) या कामासाठी आवश्यक असलेले साहित्य घेऊन गेलेल्या मालवाहू ट्रेनच्या इंजिनात बिघाड झाला आणि ही ट्रेन नॅरोगेजवर तब्बल सहा तास थांबून राहिली.
नॅरोगेज ट्रॅक नादुरुस्त असल्याने मिनीट्रेनची माथेरान-नेरळ ही प्रवासी सेवा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे, मात्र पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने माथेरान ते अमन लॉज अशी वाहतूक सुरू केली आहे. पर्यटकांना नेहमीच नेरळ-माथेरान या मिनीट्रेनचे कायम आकर्षण राहिले आहे. त्यात मिनीट्रेनला जागतिक वारसा मिळविण्याच्या नामांकनासाठी रेल्वे बोर्ड धडपडत आहे. हे लक्षात घेऊन नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावर मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
गेल्या 15 दिवसांपासून नेरळ येथून दररोज मालवाहू मिनीट्रेनमधून दुरुस्तीच्या कामासाठी लागणारे साहित्य नेले जात आहे. नेरळ येथून दुरुस्तीचे साहित्य घेऊन निघालेली मिनीट्रेन सोमवारी सायंकाळी 4 वाजता परतीचा प्रवास करताना बंद पडली. या मालवाहू ट्रेनच्या इंजिन एनडीएम 401 मध्ये बिघाड झाला होता. या इंजिनाची दुरुस्ती करण्यासाठी नेरळ कार्यशाळेतून तंत्रज्ञ पाठवण्यात आले. मात्र इंजिन दुरुस्त होण्यास तब्बल सहा तास लागले. 4 वाजता बंद पडलेल्या मालवाहू मिनीट्रेनने रात्री 10 वाजता आपला परतीचा प्रवास सुरू केला आणि रात्री सव्वाआकराच्या सुमारास ही मिनीट्रेन नेरळ रेल्वे स्थानकात पोहचली.