पेण : प्रतिनिधी
कोळी समाज अतिशय कष्टाळू असून येथील महिला सकाळपासून मच्छीविक्री करीत असतात. या कष्टकरी समाजासाठी भविष्यात पेणमध्ये नवीन अद्यावत मच्छीमार्केट उभारणार असल्याची ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी दिली.
पेण कोळीवाडा येथील मच्छीमार्केटच्या कामाचे भूमिपूजन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. नवीन मच्छीमार्केटसाठी जागा, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आगामी काळात नगराध्यक्षा नक्कीच करतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
पेण कोळीवाडा येथे सध्या शेडच्या स्वरूपात बांधकाम करण्यात येणार असून, त्यामुळे मच्छीविक्रेत्या भगिंनीना रस्त्यावर न बसता शेडमध्ये बसून मच्छीविक्री येईल. भविष्यात कोळी बांधवासाठी सुसज्ज मच्छीमार्केट कशाप्रकारे बांधता येईल, यासाठी आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार असल्याचे नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी या वेळी सांगितले.
पेण नगर परिषदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती दर्शन बाफणा, नगरसेविका शेहनाज मुजावर, देवता साकोस्कर, अश्विनी शहा, नगरसेवक अजय क्षीरसागर यांच्यासह कोळीवाडा पंचकमिटी अध्यक्ष व कोळी बांधव उपस्थित होते. विजय आवास्कर यांनी आभार मानले.