अलिबाग ः प्रतिनिधी
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच उत्सवाचा भाग म्हणून इंडिया यूएस इमर्जन्सी मेडिसिन कौन्सिल, जागतिक आरोग्य संघटना, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्यातर्फे स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा आयोजित केली गेली. या माध्यमातून 12 राज्ये आणि तब्बल सात हजार किमीचे अंतर रायगड जिल्ह्यातील प्रसाद प्र. चौलकर (मुरूड) आणि अभिजित सिंग कोहली (पनवेल) या अनुभवी बाईकर्सनी 23 दिवसांत यशस्वीपणे पूर्ण केले. 8 नोव्हेंबर रोजी पनवेल येथून सुरू झालेली परिक्रमा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात या 12 राज्यांत प्रवास करून 30 नोव्हेंबर रोजी पनवेल येथे समाप्त झाली. या परिक्रमेत इजा प्रतिबंध आणि रस्ता सुरक्षा हे महत्त्वाचे संदेश देण्यात आले, तसेच अतूल्य भारतचा प्रचार आणि प्रसारही प्रसाद चौलकर आणि अभिजित सिंग कोहली यांनी केला. त्यांचा ठिकठिकाणी स्वागत व सन्मान झाला. प्रसाद चौलकर हे आंतरराष्ट्रीय पदकविजेते खेळाडू असून त्यांनी याआधी भारतातील 22 राज्ये आणि एकूण तीन देशांत बाईक राइड केलेली आहे, तर अभिजित सिंग कोहली हेही एक अनुभवी बाईक रायडर असून त्यांनी कोविड-19चे संकट दूर व्हावे यासाठी तख्त यात्रेच्या माध्यमातून पाच हजार 436 किमी अंतर पूर्ण केलेले आहे. येत्या काळात रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी युवक-युवतींना एकत्र घेऊन विशेष उपक्रम राबविणार असल्याचे चौलकर व कोहली यांनी सांगितले.