लहान मुलांवर हल्ले; नागरिक हैराण
पाली : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात माकड व वानरांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. या नव्या समस्येने पालीकर हैराण झालेत. वृद्ध व महिला, लहान मुले यांच्यावर माकडे हल्ला करीत असताना असुरक्षितपणाची भावना वाढीस लागली आहे.
मागील आठवड्यात देऊळवाडा येथील एका शाळकरी लहान मुलावर वानराने पाठीमागून हल्ला केला होता. दप्तर असल्याने तो वाचला. मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच काही लोकांवर देखील या माकडांनी हल्ले करून जखमी केले आहे. त्यामुळे या वानर व माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी वनविभाग व तालुका प्रशासनाकडे नागरिकांनी केली आहे.
पालीतील राम आळी, बाजारपेठ, बल्लाळेश्वर मंदिर परिसर, देऊळवाडा, मधली आळी, खडकाळी, कासार आळी, सोनार आळी, आगर आळी, बेगर आळी, उंबरवाडी, सावंत आळी, अशा सर्वच गजबजलेल्या भागात माकडे आणि वानरे रोज धुमाकूळ घालत आहेत. मोठमोठी वानरे आणि माकडे छतावर उड्या मारून घराचे पत्रे व कौले फोडतात, तसेच ड्रेनेजचे पाईप, विजेच्या तारा, गच्चीत ठेवलेले सामान, पाण्याच्या टाक्या, झाडाच्या कुंड्या, झाडे यांचे अतोनात नुकसान करत आहेत. त्यांच्या या उपद्रवामुळे परसातील झाडे, फळे, फुले यांचे नुकसान होत आहे. बाहेर कोणत्याही गोष्टींचे वाळवण घालता येत नाही. इतकेच नव्हे तर घराची दारे, खिडक्या पण उघड्या ठेवणे अवघड झाले आहे. घरात शिरून माकडे अन्नधान्य, भाजीपाला यांची नासाडी करत आहेत. वाळत घातलेले कपडेदेखील फाडून टाकतात. यामुळे मोठी आर्थिक हानी होत आहे.
काही वर्षांपूर्वी पालीत वानर व माकडांनी धुमाकूळ घातला होता. तेव्हा शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन सर्व माकडांना पकडून बंदोबस्त केला होता. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करत आहे. वनविभाग व प्रशासनाने वेळीच यावर काही ठोस उपाययोजना करावी व वानर आणि माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
-विद्येश आचार्य, निवेदनकर्ते, पाली
माकडांच्या त्रासाबद्दल काही नागरिकांनी वनविभागाकडे तक्रारी केल्या आहेत. माकडांचा उच्छाद ज्या ठिकाणी आहे तिथे वनविभागातर्फे फटाके वाजवून त्यांना हुसकावले जाते. माकडांची टोळी असल्यास काही वेगळा उपाय करावा लागेल. माकडे पकडण्यासाठी वनविभागाकडे विशेष कार्यपद्धती नाही. तरी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करेल.
-रितेश नागोशे, वनक्षेत्रपाल, पाली-सुधागड
वानर व माकडांच्या जीवाला देखील धोका
काही महिन्यांपूर्वी येथील राम आळीमध्ये विजेचा धक्का लागून आठवडाभराच्या अंतराने दोन वानरांचा मृत्यू झाला होता, तसेच गावात बिनदिक्कत फिरणार्या या वानर व माकडांना विजेचा धक्का व वाहनांची ठोकर लागण्याचा देखील धोका आहे.