मुरूड तहसीलदारांना निवेदन
मुरुड : प्रतिनिधी
प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने मुरूड तहसील कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि. 29)काळ्या फिती लावून राज्यव्यापी आंदोलनाचे रितसर निवेदन तहसीलदार गमन गावित यांना दिले.
चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने अखेर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. तहसीलदार गमन गावित यांना निवेदन देताना संदेश वाळंज, संजय तांबे, प्रेमनाथ पाटील, काशिनाथ पिरकट, धर्मा म्हात्रे, रजत वारगे, साईनाथ दिवेकर, संदिप माने, विकास गुरव, कृष्णा वारगे, रेखा बुल्लु आदिसह कर्मचारी उपस्थित होते. हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (वित्त) यांना पाठविण्यात आले आहे.
वर्ग 4 ची पदे निरसित करु नये, याबाबत 14 जानेवारी 2016 चा शासनाचा 25 टक्के चतुर्थश्रेणी पदांच्या निरसित करण्याचा निर्णय रद्द करावा, अनुकंपा तत्वावरील पदे त्वरित भरली जावीत, वारसाहक्काची पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्त कर्मचार्याच्या एका पाल्यास शासनसेवेत समाविष्ट करावे, रिक्त पदे सरळसेवा भरतीने त्वरित भरावीत, वेतन त्रूटीसंदर्भात खंड 2 च्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, वर्षानुवर्षे कंत्राटाने काम करणार्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, आकृतीबंधानुसार सरळसेवेत तत्काळ रिक्त पदे भरण्यात यावीत, आरोग्य सेवेतील 925 चतुर्थश्रेणी बदली कामगारांना विशेष बाब म्हणून शासनसेवेत कायम करावे, राज्य सरकारी विमा योजना, मंत्रालय उपहार गृहे, राज्य राखीव पोलीस बल, सार्वजनिक आरोग्य विभाग येथील चतुर्थश्रेणी पदे त्वरित भरण्यात यावीत अशा विविध स्वरुपाच्या 25 मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या असून त्याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आले आहे.