Breaking News

नवी मुंबईत महिलांवरील अत्याचारांत वाढ

2021 मध्ये तब्बल 658 गुन्ह्यांची नोंद

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांवर होणार्या अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 2021 या वर्षामध्ये महिलांशी संबंधित बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, छळवणूक त्याचप्रमाणे छेडछाडीचे असे तब्बल 658 गुन्हे दाखल झाले आहेत. 2020 या वर्षाच्या तुलनेत 2021 या वर्षात बलात्कार आणि विनयभंगासह महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे महिलांसाठी नवी मुंबई किती सुरक्षित आहे? यावर सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत सन- 2020 मध्ये बलात्काराच्या 127 घटना घडल्या असून त्यापैकी 126 गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, 2021 या वर्षामध्ये नवी मुंबईत 212 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे (पोक्सो) सुमारे 85 गुन्हे दाखल आहेत. यातील 211 गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यावरुन मागच्या वर्षीच्या तुलनेत 2021 वर्षामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये 85ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यात लग्नाचे आमिष दाखवून, नोकरीचे आमिष दाखवून, शेजार्‍यांकडून, नातेवाईक यांच्याकडून, मित्र-ओळख करून मैत्री करुन बलात्काराच्या घटना घडल्याचे दिसून येत आहे. यातील सर्वात जास्त बलात्काराच्या घटना या ओळखीच्या व्यक्तीकडून झाल्याचे आढळून आले आहे.

या घटनांबरोबरच महिलांवरील विनयभंगाच्या गुन्ह्यातदेखील वाढ होताना आकडेवारीवरून दिसून आले आहे. 2020मध्ये 198 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले असून त्यातील 187 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर 2021 मध्ये 214 विनयभंगाचे गुन्हे घडले असून त्यातील 205 गुन्हे उघडकीस आले आहेत. या आकडेवारीवरुन विनयभंगाच्या गुन्ह्यातदेखील साधारण 15 ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी महिलांच्या छेडछाडीचे 24 गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी 21 गुन्हे उघडकीस आले होते. तर 2021 मध्ये महिलांच्या छेडछाडीचे 26 गुन्हे दाखल असून यातील 22 गुन्हे उघडकीस आले आहेत.

2020 या वर्षामध्ये हुंडाबळीचे 14 गुन्हे दाखल झाले असून 2021 वर्षात त्यासंबंधीचे 15 गुन्हे घडल्याची नोंद आहे. 2020 या वर्षात महिलच्या छळवणुकीचे (498ए नुसार) 94 गुन्हे दाखल झाले होते. मात्र, 2021 या वर्षामध्ये छळवणुकीचे 190 गुन्हे दाखल झाले आहेत. यावरुन महिलावरील कौटुंबिक हिंसाचाराच्या (छळवणुकीच्या) घटनांमध्येदेखील नवी मुंबईत वाढ होताना दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबात पती-पत्नी मधील वाद टोकाला गेल्याने महिलांकडून कौटुंबिक छळाच्या तक्रारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक छळवणुकीच्या तक्रारीच्या संख्येत वाढ होत असल्यानेदेखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनामध्येही वाढ होताना दिसून येत आहे.

अपहरण घटनांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून 2021 या वर्षामध्ये सुमारे 300 अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. यात मुलींची सर्वांत जास्त संख्या आहे. यातील सुमारे 185 मुला-मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अपहरण झालेल्या मुलींपैकी बहुतेक मुली या 15 ते 17 या वयोगटातील असून बहुतांश मुलींना प्रेम प्रकरणातून तसेच लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. यातील अनेक मुलींनी प्रेमप्रकरणातून लग्नदेखील केल्याचे आढळून आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply