पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या अंतर्गत खारघर मॅरेथॉन, क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, सायक्लोथॉन, कॅरम, खो-खो, बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धा तसेच नृत्य, चित्रकला, गायन, वक्तृत्व या कला स्पर्धांचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
नमो चषक अंतर्गत 13 जानेवारी रोजी खारघर येथे सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे, तर 15 जानेवारीपासून खुल्या गटातील दिवस रात्र भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा कळंबोलीच्या भव्य मैदानावर होणार आहे. प्रवेश विनामूल्य असून सर्व खेळाडूंना आकर्षक टी-शर्ट देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास एक लाख रुपये व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला 50 हजार रुपये व चषक देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी असून त्यासाठी तेजस जाधव (9594945089), विकी टेकवडे (8369883010) किंवा आयुष मळेकर (9137298484) यांच्याशी संपर्क साधावा तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी व माहितीसाठी https://namochashak.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या देशाच्या हितासाठी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वस्व अर्पण केले आहे. फक्त आपल्याच देशाला नाही, तर संपूर्ण जगाला त्यांचा अभिमान आहे. त्या अनुषंगाने नमो चषक अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमुळे युवा पिढीला सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्राकडे अधिकाधिक आकृष्ट करता येणार असून पनवेल विधानसभा क्षेत्रात 25 हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांना सहभागी करण्याचे उद्दिष्ट आहे.
-प्रशांत ठाकूर, आमदार