पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा झाला.
विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी तथा समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी तसेच गहाण ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच विजयशेठ घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या मेळाव्यात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र सराव परीक्षेतील निकालावर सविस्तर चर्चा करून गुणवत्ता वाढीसाठी पालकांच्या विशेष सहकार्याने शाळा राबवू इच्छीत असलेल्या विविध उपक्रमांविषयी यथासांग चर्चा करण्यात आली. मेळाव्याचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करताना यशस्वी भावी आयुष्यासाठी शालेय जीवनातला या महत्त्वाच्या टप्प्यावर परीक्षेच्या नजिकच्या काळात विशेष श्रम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले, तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सजग असण्याची आवश्यकताही अधोरेखित केली. यासोबतच विद्यार्थ्यांना प्राचार्य साधना डोईफोडे यांच्यासह देवेंद्र म्हात्रे, जोत्स्ना ठाकूर, सागर रंधवे, रवींद्र भोईर, प्रमोद कोळी, प्रा. माणिक घरत, प्रा. उमेश पाटील व प्रा. बाबुलाल पाटोळे आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
या वेळी स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्यासह स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजयशेठ घरत, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, विद्यालयाचे उपप्राचार्य जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी, लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, वर्गशिक्षक चित्रा पाटील, सागर रंधवे, संदीप भोईर, प्रा. माणिक घरत, प्रा. उमेश पाटील तसेच सर्व अध्यापक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्रा पाटील (माध्यमिक) व प्रा. बाबुलाल पाटोळे (ज्यु.कॉलेज) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सागर रंधवे यांनी सूत्रसंचालन केले.