महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील गंधारपाले येथील ऐतिहासिक बौद्ध लेण्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत पर्यटन आणि मतदार जनजागृती करण्यात आली. महाड महसूल विभाग, पंचायत समिती, गांधारपाले ग्रामपंचायत यांच्या संयुक्तवतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. जागतिक पर्यटन दिन, मतदार दिन आणि मराठी भाषा दिन यांचे औचित्य साधून महसूल विभाग, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयामार्फत गांधारपाले परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ऐतिहासिक बौद्धकालीन लेण्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आयडियल इंग्लिश स्कूल आणि प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी गड, किल्ले आणि इतर पर्यटन स्थळांची चित्रे काढून पर्यटनाचे महत्त्व पटवून दिले. महाडच्या उपविभागीय अधिकारी पुदलवार, तहसीलदार सुरेश काशिद, गटविकास अधिकारी पोळ, गटशिक्षणाधिकारी सुनीता चांदोरकर, सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे डॉ. राहुल वारंगे, प्राध्यापक अंजय धनावडे यांनी यावेळी आपले विचार मांडले. गांधारपाले सरपंच रेहाना सोलकर, उपसरपंच रोहिणी गायकवाड, माजी सरपंच मन्सूर ताज यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.