Breaking News

स्त्री सक्षमीकरण काळाची गरज

स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद, फेमिनिझम हे शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत, पण दैनंदिन आयुष्यात या विषयाचा कुणी सहसा वेगळा असा विचार करत नाही. या व्याख्यांचे विविध पैलू आहेत आणि ते आपल्या जगण्या वागण्यात मिसळून गेलेत या अनुषंगाने पाहायला गेलं तर असे लक्षात येईल की लहानपणापासून मनावर बिंबवल्या गेलेल्या किंवा सभोवतालच्या वातावरणातून आपण घेतलेल्या शिकवणीनुसारच आपलं म्हणजे स्त्री आणि पुरुषाचं आचरण आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वतःच्या स्त्री-पुरुष समानतेच्या अनुभवाशी प्रामाणिक राहून महिला सक्षमीकरण या मुद्द्याकडे पाहता येईल. महिला सक्षमीकरण हा विषय मल्टी डायमेन्शनल आहे विविध दृष्टिकोनातून तो अभ्यासायला हवा. केवळ पुरुषांच्या तुलनेत स्त्री किती दुर्बल आहे हे तपासून चालणार नाही. हा विषय केवळ स्त्रीमुक्ती चळवळीचा विचार नाही, तर तो अधिक व्यापक स्वरूपातून मानवमुक्तीचा विचार करणारा असावा. जागतिक शांतता आणि अणवस्त्रविरहित जग, दारिद्य्र निर्मूलन, हिंसाविरहित कुटूंब, पृथ्वीचे रक्षण आणि संवर्धन, हिंसामुक्त शांततापूर्ण जीवन तिच्या आत्मनिर्भरतेबरोबरच तिचे आर्थिक सक्षमीकरण या सगळ्याचा साकल्याने विचार तिच्या सक्षमीकरणासाठी व्हायला हवा. शासन, कायदा लॉ अ‍ॅण्ड ऑर्डर, पुरुषी अहंकार, बेगडी सांस्कृतिक मूल्य, पुराणं, भाकडकथा यांनी केलेले महिलांचे ढोंगी उदात्तीकरण हे सर्व तिच्या सक्षमीकरणाच्या आड येत असले तरीही स्वतः तिच्यात अमूलाग्र बदल घडणे व विचाराची दिशा बदलणे अनिवार्य आहे. एकीकडे स्त्रियांना मतदानाचा हक्क, नोकरीत समान काम समान वेतन, समान संधी, गर्भपाताचा अधिकार, बाळंतपणाची रजा अशा अनेक गोष्टी टप्प्याटप्प्याने होत गेल्या, पण तरीही पुरुषप्रधान संस्कृतीत तिला आत्मभान येणे तिचं मानसिक खच्चीकरण यातून तिला मुक्त करणं गरजेचे आहे. गृहिणी असो वा नोकरदार जर तिने अंतर्मुख होऊन  स्वतःचं अलिप्तपणे अ‍ॅनालिसिस केलं तर ध्यानात येईल की कमावत्या स्त्रीला तिच्या पैशावर हक्क सांगता येतो? आर्थिक गुंतवणूक कुठे व कशी करावी याचे निर्णय नवरा घेतो. घरातल्या महत्त्वाच्या निर्णयात घरातल्या बाईचे मत विचारात घेतले जात नाही. हे निर्णय स्वातंत्र्य तिला नसणे हा तिच्या सक्षमीकरणाच्या मार्गातील एक प्रमुख अडसर आहे असं प्रकर्षानं वाटतं. तिला समाज व पुरुष बरोबरीने वागवतो का हे महत्त्वाचं. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या देशात स्त्री सक्षमीकरणाचे पदर भिन्न असले तरी त्यांची मूलभूत समस्या समान आहे. रोगराई, गरिबी, भूक विस्थापन, युद्ध, नैसर्गिक आपत्ती याचा परिणाम तिच्या सक्षमीकरणाआड येतोच आणि पुढे या समस्यांचे बायप्रॉडक्ट म्हणजे शारीरिक कष्ट, मानसिक असंतुष्टता, असमाधान, अस्वस्थता, चिंता, एकटेपणा, नैराश्य आणि त्यातून उद्भवणारे बाईपणाचे आजार देशाच्या सीमारेषा ओलांडून सर्वत्र पसरत आहेत. गृहिणी आणि नोकरदार दोघीही हाऊस वाइफ सिंड्रोम व करियर वुमन गील्ट सिंड्रोम या कात्रीत सापडल्या आहेत. हाऊस वाईफ सिन्ड्रोम मी घरातच असते, माझा व्यवसाय काय तर घरकाम, मी फक्त नवरा, मुलं, वडीलधारे यांच्या सेवेत असते. मी खूप थकते, माझी चिडचिड होते, कुणाचं माझ्याकडे लक्ष नाही, मी एकटी पडलीय या भावना तिचा ताबा घेतात. त्यात नवर्‍याचे करिअर, व्यस्त लाइफस्टाइल किंवा देशाटन यामुळे होणारं सेक्स स्टारवेशन यामुळे तिच्या उवा उद्वेगात अधिक भर पडते. अशा अवस्थेत तिच्या सक्षमीकरणाचा विचार कसा करावा. दुसरीकडे जाहिराती, स्त्रीविषयक मासिके, मालिका, सोशल मीडिया, स्त्री जन्मा ही तुझी कहाणीचे गोडवे गातात. तिचे सार्थक मुलांना वाढवण्यात आणि संसारासाठी खस्ता खाण्यात आहे हेच अंतिम सत्य आहे, असं उच्च रवात सांगितले जाते. मग करियर करणार्‍या, नोकरी करणार्‍या, वेगळे काही करू पाहणार्‍या स्त्रिया या आपलं स्त्रीत्व गमावून बसलेल्या आहेत असे चित्र रंगवण्यात येते. त्यात जर तिने निर्धाराने करियर सोडायला नकार दिला आणि जर घरात काही कमी जास्त झालं तर सारा दोष तिच्या करिअरला दिला जातो आणि मग करियर वुमन गिल्ट सिड्रोम अनेकींना अस्वस्थ करू लागतो. सतत घरातल्या व मुलांच्या प्रश्नांनी वैतागलेली ‘ती’ स्वतःची मासिक पाळी, ऐच्छिक व लादलेले गरोदरपण, बाळंतपणाच्या वेदना हे सगळं ती एकीकडे निभावते, तर दुसरीकडे आदर्श स्त्री होण्याच्या नादात एकाच वेळी सगळ्यांना खुश ठेवणं, मुलांवर नको इतका पहारा, अति शिस्त याचा नकारात्मक परिणाम होतोय त्याचा तिने गांभीर्याने विचार करायला हवा. संसार कसा टिकवावा? नवर्‍याची मजी कशी राखाल? लग्न सांभाळण्याच्या क्लुप्त्या, बाईपणाची सार्थकता असे वरवर ज्ञान वाटणार्‍या पुस्तकांचे पेव फुटले आहे. त्यातून स्त्रीच ज्ञान आणि सक्षमीकरण कसे साध्य व्हावे याकरिता तिने स्वतःचं आत्मनिरीक्षण करणं अपेक्षित आहे. तिला स्वातंत्र्य हवं आहे, सक्षम व्हायचे म्हणजे नेमके काय? तिला स्वतःची स्वतंत्र ओळख हवी म्हणजे नेमके काय हवे आहे? हे तिचं तिने शोधून ओळखणं क्रमप्राप्त आहे, तरच तिला तिच्या सक्षमीकरणासाठी लढता येईल. स्त्री-पुरुषांनी एकमेकांना आपापला अवकाश देत एकमेकांना पूरक म्हणून जगण्याची मजा घ्यायला हवी. असं झालं तर दोघेही आपापली ओळख जपत एकमेकांसाठी जगतील ही कल्पनाच किती आशादायी आहे. ही कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी बाई समजून घ्यावी लागेल आणि ती समजून घ्यायचे असेल तर तिच्याकडे केवळ बाई नाहीतर बाई माणूस म्हणून पहावे लागेल. निरोगी शरीराबरोबरच आवश्यक आहे. निरोगी मन, सत्यम शिवम सुंदरम हा आपल्या सांस्कृतिक मूल्यातील बहुमूल्य ठेवा, तो मनी वसवला तर आपण आपल्या मनातील गिधाडांना सहज आवारू शकतो, पण प्रॉब्लेम हा आहे की गेंड्याची कातडी असलेल्या विकृत समाजाला केवळ शब्दांचा मार पुरेसं नसतो. तिथे असते कठोर शिक्षेची गरज. म्हणूनच राष्ट्रीय महिला सुरक्षा आयोग, इंडियन पिनल कोडमधील महिला सुरक्षाविषयक विविध कायदे यामुळे आशेचा किरण जागृत झाला आहे. म्हणून स्त्रीनेही जागृत राहून आपल्या हक्कासाठी सजग राहिले पाहिजे. आपल्या सक्षमीकरणाआड कोणी येत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. कारण अन्याय करणारा जसा दोषी असतो तसा अन्याय सहन करणाराही असतोच. स्त्रियांचा सार्वजनिक क्षेत्रातील परीघ विस्तारत आहे. तिची रोजची लढाई अधिक गुंतागुंतीची व जीवघेणी झाली आहे. लिंगभेदाला प्राधान्य देणारी समाज व्यवस्था मोडून स्त्री पुरुष समानता हा तिचा घटनादत्त अधिकार तिला बहाल झाला तरच ती सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवेल. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा आवाज जर समाजातील प्रत्येक घटकाने ऐकला तर तो हेच सांगेल की स्त्रीचा आदर करणे तिच्याकरिता परस्पर विश्वास व सामंजस्याचं वातावरण निर्माण करणे. सभोवतालचं वातावरण अधिक मैत्रीपूर्ण करून तिला प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य आहे, कारण प्रत्येक स्त्री ही कुणाची तरी बहीण, मुलगी, बायको आई असतेच हे विसरून कसं चालेल. तिचे सर्वांगीण सक्षमीकरण हे आपलेच तर कर्तव्य आहे.

-महेंद्र कुरघोडे, नवीन पनवेल (मो. क्र. 9869212939)

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply