Breaking News

चेन्नईला हरवून मुंबई ‘किंग’

चेन्नई : वृत्तसंस्था

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जवर 46 धावांनी सहज विजय मिळवला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी (67) खेळी करून मुंबईच्या विजयात योगदान दिले. 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ 109 धावाच करता आल्या. या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसर्‍या स्थानी पोहचला असून, ‘प्ले-ऑफ’साठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.

मुंबईने दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसनने 3 चेंडूंत 2 चौकार लगावत तडाखेबाज सुरुवात केली होती, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. धोनीच्या जागी नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेला कर्णधार सुरेश रैना केवळ 2 धावा करून झेलबाद झाला. अंबाती रायडूला भोपळाही फोडता आला नाही. केदार जाधव खेळपट्टीवर स्थिरावत असताना त्याला कृणालने 6 धावांवर त्रिफळाचीत केले. नव्या दमाच्या ध्रुव शोरे याच्याकडून चेन्नईला अपेक्षा होत्या, पण तो मोठा फटका खेळताना पाच धावा काढून झेलबाद झाला.

एकीकडे गडी झटपट बाद होताना एकाकी झुंज देणारा मुरली विजय 12व्या षटकात झेलबाद झाला. पहिल्या सहा फलंदाजांमध्ये दुहेरी धावसंख्या गाठणारा तो एकमेव फलंदाज ठरला. विजयने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने 38 धावा केल्या. मिचेल सँटनर आणि ब्राव्हो यांच्यात भागीदारी होण्यास सुरुवात होतानाच ब्राव्हो 20 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर कोणीही फलंदाज फार काळ खेळपट्टीवर स्थिरावला नाही.

त्याआधी पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या मुंबईच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करीत आपले इरादे स्पष्ट केले होते, परंतु क्विंटन डी-कॉक लवकर माघारी परतला. यानंतर एविन लुईसच्या साथीने रोहितने मुंबईचा डाव सावरला. रोहितने 48 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. त्याला साथ देणार्‍या लुईसने 32 धावा केल्या. लुईस माघारी परतल्यानंतर मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. अखेरीस हार्दिक पांड्या आणि किएरॉन पोलार्ड यांनी मुंबईला 155 धावांपर्यंत मजल मारून दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply