दशकानुदशके काश्मीरमधील सत्य दडपले गेले अशा प्रतिक्रिया आपण अनेक ठिकाणी ऐकलेल्या, वाचलेल्या किंवा पाहिलेल्या असतील, परंतु त्याचा नेमका अर्थ ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रभावीपणे सांगतो. असे चित्रपट मोठ्या संख्येने निर्माण व्हायला हवेत असे उद्गार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले याला फार मोठा अर्थ आहे, कारण नरेंद्र मोदी नावाच्या याच उत्तुंग नेतृत्वाने जम्मू-काश्मीर राज्याचे 370व्या कलमाचे कवचकुंडल काढून टाकले आणि दहशतवादाने चाळण झालेला तेथील समाज धाडसाने देशाच्या मुख्य प्रवाहाला जोडून टाकला.
जुने जाऊ द्या मरणालागुनि अशी एका जुन्या कवितेतील ओळ आहे. अधुनमधून ती आठवत राहते. काही स्मृती इतक्या कटू असतात की विसरू म्हणता विसरता येत नाहीत. अशा कटू स्मृती आणि अनुभव मागे टाकून पुढे जायचे असते. मागे टाकून याचा अर्थ पूर्णत: विसरून असे मात्र नव्हे. काश्मीरमध्ये घडून गेलेल्या भयंकर घटना कधीही न विसरता येण्याजोग्या आहेत, कारण आजही या जखमा ओल्या आणि भळभळणार्या आहेत. नव्वदीच्या दशकामध्ये काश्मीरचे बर्फ धुमसू लागले होते. पाकिस्तानच्या नापाक इराद्याने काश्मीर खोर्यात विष कालवण्याचे कारस्थान तडीला जाताना दिसत होते. काश्मीरचा प्रश्न हा काही नव्वदीच्या दशकात निर्माण झालेला नव्हता. 1947 साली भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती रक्तरंजित फाळणीमधून झाली. त्या फाळणीच्या वेळी काश्मीरचे भूत बाटलीतून बाहेर आले होते. त्या इतिहासात तूर्त न गेलेलेच बरे. पुढील अनेक दशके काँग्रेसच्या राजवटीत काश्मीरमधील सत्य वारंवार दडपले गेले. पृथ्वीवरील नंदनवन असा लौकिक असलेल्या काश्मीरच्या भूमीत किती निष्पाप नागरिकांचे रक्त सांडले त्याची ना कुणी गणती ठेवली, ना कुणी पर्वा केली. काँग्रेसच्या आशीर्वादाने 370व्या कलमाची कवचकुंडले मिरवत जम्मू आणि काश्मीर खोर्यात राज्य करणारे नेते श्रीमंत झाले आणि तेथील निष्पाप नागरिक मात्र पिचत राहिला, मरत राहिला. नव्वदीच्या दशकात तर हजारो काश्मिरी पंडितांना आपली मातृभूमी सोडून पलायन करावे लागले. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. शेकड्यांच्या संख्येत दरमहा काश्मिरी पंडितांच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आल्या. दहशतवाद्यांनी घडवलेले बॉम्बस्फोट नागरिकांच्या इतके अंगवळणी पडले होते की असे काही हिंसक प्रकार घडल्यानंतर काही तासांत व्यवहार सुरळीत होत असत. जणू काही काही घडलेच नाही. या काळात बळी गेलेल्या किंवा देशोधडीला लागलेल्या काश्मिरी पंडितांच्या वेदनेला खर्या अर्थाने वाचा फुटली ती या वर्षी. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. भारतातील प्रत्येक सुजाण नागरिकाने तो आवर्जून बघायला हवा. हा चित्रपट पाहून झाल्यावर सिनेमागृहातून बाहेर पडणार्या प्रेक्षकांचे डोळे ओलेच असतात आणि बराच काळ ते ओले राहतात. अर्थात, चित्रपटाच्या निर्मात्यांवर उजव्या विचारसरणीचा आरोप करणार्या काँग्रेसी मनोवृत्तीच्या लोकांचा अपवाद तेवढा करावा लागेल. काश्मीरमधील दडपलेले सत्य ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटाने लोकांसमोर आणले. काश्मीरमधील जनजीवन आता कुठे सुरळीत होत आहे. बेघर झालेल्या तेथील पंडित समाजाच्या जिवात जीव आला आहे. आपली वेदना जाणणारा कोणीतरी एक नेता आपल्यासमोर आहे याचा त्यांना दिलासा वाटत असेल. ‘द काश्मीर फाइल्स’ नेमकी हीच कहाणी सांगतो.